काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांमुळे आणि बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाला विरोधी पक्षांकडून होत असलेल्या तीव्र विरोधामुळे निवडणूक आयोग सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने रविवारी दुपारी ३ वाजता नवी दिल्ली येथील नॅशनल मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. बिहारमधील मतदार याद्यांचं पुनरीक्षण आणि राहुल गांधी यांनी केलेल्या सनसनाटी आरोपांच्या पार्श्वभूमीवर होणारी ही पहिलीच पत्रकार परिषद असल्याने या पत्रकार परिषदेत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेशिवाय इतर कुठल्याही मुद्द्यावर पत्रकार परिषद आयोजित केली जाणे ही असामान्य बाब आहे. निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेचा विषय अद्याप स्पष्ट केलेला नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पत्रकार परिषदेचा विषय हा विरोधी पक्षांकडून करण्यात येत असलेल्या गंभीर आरोपांशी संबंधिकअसू शकतो.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदानाच्या आकड्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप वारंवार केला आहे. तसेच महाराष्ट्र, हरयाणामधील विधानसभा आणि कर्नाटकमधील लोकसभा निवडणुकीत भाजपाला जिंकवण्यासाठी मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता.
ज्या लोकांची नावं मतदार यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने जोडली गेली आहेत किंवा हटवली आहेत अशा लोकांची नावं सादर करण्याची सूचना निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी केली होती. तसेच यासोबत एक शपथपत्रही सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. एवढंच नाही तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वत:ची स्वाक्षरी असलेलं शपथपत्र सादर केलेलं नाही, त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही निवडणूक आयोगाने केली आहे.