बिहारचा निवडणूक आखाडाही तापला
By Admin | Updated: July 7, 2015 23:23 IST2015-07-07T23:23:21+5:302015-07-07T23:23:21+5:30
केंद्र सरकारने सामाजिक आणि आर्थिक चित्र स्पष्ट करणारी जनगणनेची माहिती जारी केली असली तरी जातनिहाय आकडेवारी रोखून ठेवल्याने बिहारमधील प्रचारादरम्यान नवा वाद उफाळला आहे.

बिहारचा निवडणूक आखाडाही तापला
पाटणा : केंद्र सरकारने सामाजिक आणि आर्थिक चित्र स्पष्ट करणारी जनगणनेची माहिती जारी केली असली तरी जातनिहाय आकडेवारी रोखून ठेवल्याने बिहारमधील प्रचारादरम्यान नवा वाद उफाळला आहे.
जातनिहाय आणि अल्पसंख्याकांच्या संख्येसंबंधी आकडेवारी दडवून ठेवत सरकारने कट रचल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चानेही (एचएएम) या मागणीत सूर मिसळत रालोआची अडचण वाढविली आहे.
‘मार्च’ नेण्याचा इशारा
केंद्र सरकारने जातनिहाय आकडेवारी जारी न केल्यास १३ जुलै रोजी पाटण्यातील राजभवनावर मार्च नेण्याचा इशारा लालूप्रसाद यादव यांनी दिला आहे. आपल्या जातीची लोकसंख्या किती हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही जातींसंबंधी वेगवेगळे दावे ऐकले आहेत. या जनगणनेतून नेमकी संख्या समोर येईल, असे ते दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. जनतेच्या मागणीनुसार ही आकडेवारी जारी करायला हवी. केंद्र सरकार ही आकडेवारी जारी का करीत नाही, हे माझ्या आकलनापलीकडचे आहे, असे नितीशकुमार यांनी सोमवारी म्हटले. (वृत्तसंस्था)
एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न -भाजप
४जातनिहाय आकडेवारी जारी करण्याची मागणी करीत राजद आणि जेडीयूने समाजातील सलोखा बिघडविण्याचे काम चालविले आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर यादव यांनी केला.
४पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकासाकडे नेण्याची भाषा करीत असताना काही लोक जातीय राजकारणात तेल ओतत सामाजिक एकोपा बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.