UP Election 2017 : पाचव्या टप्प्याने वाढविली राजकीय पक्षांची चिंता
By Admin | Updated: March 2, 2017 13:09 IST2017-03-02T04:57:05+5:302017-03-02T13:09:42+5:30
पाचव्या टप्प्यातील मतदान ६० टक्क्यांपेक्षाही कमी झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत

UP Election 2017 : पाचव्या टप्प्याने वाढविली राजकीय पक्षांची चिंता
लखनौ : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान ६० टक्क्यांपेक्षाही कमी झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत आणि अंदाज बांधण्याला सुरुवात झाली आहे.
भाजपा, बसपा आणि काँग्रेस-सपा सर्वच पक्ष कमी मतदानाचा आपल्या संभाव्य कामगिरीवर अंदाज बांधत आहेत. पाचव्या टप्प्यात ११ जिल्ह्यांमधील ५१ जागांसाठी ५७.३६ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपा नेते वरुण गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघातील अमेठी आणि सुलतानपूर येथेही मतदानाची टक्केवारी कमीच राहिली. अमेठीत ५६.२५ टक्के आणि सुलतानपूर येथे ५६.३५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
या दोन जिल्ह्यांशिवाय सिद्धार्थनगर (५१.८२ टक्के), संत कबीरनगर (५२.३१ टक्के), बलरामपूर (५४.२५ टक्के) आणि गोनडा (५६.७३ टक्के) या सहा जिल्ह्यांमध्येही मतदान कमीच राहिले. आपलेच मतदार मोठ्या संख्येत मतदान केंद्रावर आले आणि विरोधकांचे मतदार फिरकलेच नाहीत, असा दावा प्रत्येक पक्ष करीत आहे.
सपा आणि काँग्रेस हे दोघेही आपल्या परंपरागत मतदारांवर निर्भर आहेत तर बसपाला दलित मतदारांवर विश्वास आहे. भाजपा निश्चिंत आहे. ज्या भागांत कमी मतदान झाले तो भाग मुस्लीमबहुल असल्याने आपल्याला चिंता नाही, असे भाजपा नेते सांगत आहेत. (वृत्तसंस्था)