Eknath Shinde on Uddhav Thackeray: “महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे”; उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 08:24 PM2022-06-22T20:24:12+5:302022-06-22T20:25:03+5:30
Eknath Shinde on Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर एकनाथ शिंदे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
गुवाहाटी: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. दिवसभरातील घडामोडींनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधत शिवसेनेतील बंडखोर आमदारांना भावनिक साद घालत परत येण्याचे आवाहन केले होते. याला आता एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दिवसभरातील घडामोडींनंतर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून संवाद साधत बंडखोरी केलेल्या आमदारांना भावनिक साद घातली. तुम्हाला मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल, तर तसे समोर येऊन सांगा. माझा राजीनामा मी तयार ठेवतो. केवळ मुख्यमंत्री नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायलाही मी तयार आहे. मात्र, हे सगळं तुम्ही समोर येऊन सांगा. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर काय करायचं, असा प्रश्न करत, वर्षा बंगला सोडून आता मी मातोश्रीवर जातो, असे सांगत अनेक भावनिक मुद्द्यांना हात घातला. यानंतर एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर ट्विटरवरून चार मुद्दे मांडत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला उत्तर दिले.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे, असे ४ मुद्द्यांचे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केला. याशिवाय या ट्विटला हिंदुत्व फॉरेव्हर असा हॅशटॅगही जोडला. एकनाथ शिंदेंची भूमिका पाहता, उद्धव ठाकरे यांनी साद बंडखोर आमदारांना अमान्य असून, पक्ष प्रमुखांचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.#HindutvaForever
हिंदुत्वाबद्दल बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री
शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य एकनाथ शिंदे अयोध्येला. हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री. शिवसेना आणि हिंदूत्व एकच, कधीही वेगवेगळे नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास, अयोध्येला शिवसैनिक गेले. हिंदुत्वाबद्दल बोलणारा विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या संवादात म्हटले आहे. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. कोणताही अनुभव नसताना शरद पवारांनी यांनी सांगितल्यामुळे मी मुख्यमंत्री झालो. या पदाचा मला मोह नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.