हिमाचलमध्ये दरड कोसळून आठ ठार
By Admin | Updated: August 18, 2015 22:17 IST2015-08-18T22:17:35+5:302015-08-18T22:17:35+5:30
हिमाचल प्रदेशच्या मणिकरणमध्ये मंगळवारी दुपारी दरड कोसळल्याने ऐतिहासिक मणिकरण साहिब गुरुद्वारालगतची इमारत पडून आठजण

हिमाचलमध्ये दरड कोसळून आठ ठार
मणिकरण: हिमाचल प्रदेशच्या मणिकरणमध्ये मंगळवारी दुपारी दरड कोसळल्याने ऐतिहासिक मणिकरण साहिब गुरुद्वारालगतची इमारत पडून आठजण ठार तर दहा जखमी झाले.
कुल्लुचे उपायुक्त राकेश कंवर यांनी आठ मृतदेह मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून बचाव कार्य अजूनही सुरू आहे. मृतांची संख्या वाढू शकते असे प्रत्यक्षदर्र्शींचे म्हणणे आहे. कारण ही दुर्घटना घडली त्यावेळी गुरुद्वाराला लागूनच असलेल्या या इमारतीत मोठ्या संख्येत लोक आश्रयाला होते.
या इमारतीत राहणारे बहुतांश लोक बाहेरचे असल्याने मृतदेहांचा शोध आणि त्यांची ओळख पटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुद्वारा प्रशासनाची मदत मागितली आहे. इमारतीवर दरड कोसळताच लोक सैरावैरा धावत सुटले आणि या तीन मजली इमारतीचा एक भाग कोसळल्याने अनेक लोक मलब्याखाली दबले. स्थानिक लोक आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने बचाव कार्य सुरू केले. जखमींना कुल्लुच्या इस्पितळात दाखल करण्यात आले असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे. (वृत्तसंस्था)