हत्येच्या निषेधार्थ काळी पट्टी बांधून ईदचे नमाज पठण
By Admin | Updated: June 27, 2017 00:35 IST2017-06-27T00:35:45+5:302017-06-27T00:35:45+5:30
हरयाणातील १७ वर्षीय जुनैदच्या हत्येच्या निषेधार्थ त्याच्या खंडवली गावातील लोकांनी सोमवारी दंडाला काळी पट्टी बांधून रमजान ईदचे विशेष नमाज पठण केले.

हत्येच्या निषेधार्थ काळी पट्टी बांधून ईदचे नमाज पठण
वल्लभगढ : हरयाणातील १७ वर्षीय जुनैदच्या हत्येच्या निषेधार्थ त्याच्या खंडवली गावातील लोकांनी सोमवारी दंडाला काळी पट्टी बांधून रमजान ईदचे विशेष नमाज पठण केले.
जुनैदच्या गावातील लोकांनी हत्येचे सत्र कधी संपुष्टात येणार आहे, असा सवाल यावेळी केला. खंडवली गाव दिल्लीजवळ आहे. तेथील रहिवासी शकील म्हणाले की, जुनैदच्या हत्येनंतर आम्ही ईदचा आनंद साजरा करू शकत नाही. त्यामुळे दंडाला काळी पट्टी बांधून याचा निषेध करण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेजारच्या गावातील मुस्लिमांनीही सकाळच्या नमाज पठणादरम्यान काळी पट्टी बांधली होती.
दिल्लीतील सदर बाजार येथून २२ जून रोजी आपल्या दोन भावांसह सणाची खरेदी करून जुनैद रेल्वेने घरी परतत होता. तेव्हा डब्यातील एका गटाने जुनैद आणि त्याच्या भावावर तुम्ही बीफ खाणारे आहोत, असे म्हणून त्यांना मारहाण केली. यात जुनैदचा मृत्यू झाला. पोलिसांनी जागेच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले. तथापि, जुनैदचा भाऊ हाशिमने जागेच्या वादावरून भांडण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे फेटाळून लावले. त्या दिवशीचा प्रसंग सांगताना त्याला अनेक वेळा रडू कोसळले. या घटनेला चार दिवस उलटल्यानंतर केवळ एक आरोपी पकडला गेला आहे.
काश्मीरमध्ये दगडफेक : काश्मीर खोऱ्यात ईद-उल-फित्र सण सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ईदच्या विशेष नमाजसाठी लोक मशिदी, इदगाह येथे गोळा झाले होते. तथापि, काही ठिकाणी सुरक्षा दले आणि निदर्शकांत दगडफेक आणि चकमकीच्या घटनाही घडल्या. १या चकमकीत २0 नागरिक आणि पाच पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. हजरतबल मशिदीत सर्वाधिक संख्येने लोक आले होते. येथे ५० हजारांहून अधिक लोकांनी नमाज अदा केली. सोपोर, अनंतनाग, राजपुरा, शोपियाँ आदी भागांत निदर्शक आणि सुरक्षा दलांत चकमकी झाल्या. तथापि, यात कोणीही जखमी झाले नाही.