ईडीच्या अधिकाऱ्याला हेराल्ड प्रकरण भोवले
By Admin | Updated: December 16, 2015 03:52 IST2015-12-16T03:52:39+5:302015-12-16T03:52:39+5:30
नॅशनल हेराल्डप्रकरणी क्लोझर रिपोर्टची (फाईलबंद) शिफारस करणारे अंमलबजावणी संचालनालयातील अधिकारी (ईडी) हिमांशू कुमार लाल यांची या संस्थेतून उचलबांगडी करण्यात

ईडीच्या अधिकाऱ्याला हेराल्ड प्रकरण भोवले
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी क्लोझर रिपोर्टची (फाईलबंद) शिफारस करणारे अंमलबजावणी संचालनालयातील अधिकारी (ईडी) हिमांशू कुमार लाल यांची या संस्थेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. लाल यांची विशिष्ट ओळख क्रमांक प्राधिकरणात (युआयडीएआय) उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश तडकाफडकी धडकला.
युआयडीएआय हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारित येते. पुढील वर्षी २६ डिसेंबरपर्यंत म्हणजे कार्यकाळ संपेपर्यंत लाल यांची या पदी नियुक्ती राहील. लाल हे ओडिशा कॅडर २००३ चे अधिकारी असून ते यापूर्वी ईडीमध्ये संयुक्त संचालक होते. महसूल विभागाला पाठविलेल्या अहवालात त्यांनी हेराल्ड प्रकरण फाईलबंद करण्याची शिफारस केली होती. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड खरेदीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने समन्स पाठविल्यामुळे प्रकरण तापले आहे.
संसदेतही या मुद्यावर कामकाज बंद पडले होते. काँग्रेसच्या या दोन नेत्यांविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) एफआयआर नोंदविण्याजोगे कोणतेही पुरावे नाहीत. सकृतदर्शनी तसा गुन्हा दिसत नाही, असे लाल यांनी अहवालात म्हटले होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत तक्रार केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)