आर्थिक पाहणी अहवाल - विकास दर ५.४ - ५.९ टक्के राहील
By Admin | Updated: July 9, 2014 19:12 IST2014-07-09T13:24:33+5:302014-07-09T19:12:12+5:30
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बुधवारी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल मांडत २०१४-१५ या आर्थिक वर्षात विकासदर ५.४ ते ५.९ टक्के इतका राहिल, असे नमूद केले

आर्थिक पाहणी अहवाल - विकास दर ५.४ - ५.९ टक्के राहील
>
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - पावसाची स्थिती असमाधानकारक राहिली असली तरी २०१४ - १५ या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ५.४ ते ५.९ टक्क्यांच्या दराने वाढेल असा निष्कर्ष आर्थिक पाहणी अहवालात असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. अर्थात सर्वसामान्यांना ग्रासणारी महागाई कमी होण्यास काही काळ जावा लागेल अशी कबुलीही त्यांनी दिली.
आर्थिक पाहणी अहवालातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे -
- २०१२ - १३ मध्ये राष्ट्रीय सकल उत्पादन किंवा जीडीपीची वाढ दशकभरातील नीचांकाने म्हणजे ४.५ टक्क्यांनी झाली. जी २०१३ - १४ मध्ये किंचित वधारत ४.७ टक्के झाली. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा हा दर या आर्थिक वर्षात पाच टक्क्यांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे.
- पॅसिफिक समुद्रातील वादळी परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम मान्सूनवर झाला असून त्याचा विपरीत परिणाम काही प्रमाणात अन्नधान्य उत्पादनावर व परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता.
- जर सरकारने गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले आणि अथर्व्यवस्थेच्या वाढीसाठी सकारात्मक प्रयत्न केले तर आर्थिक वाढ येत्या काळामध्ये ७ ते ८ टक्क्यांच्या गतीने होण्याची अपेक्षा आहे.
- आर्थिक शिस्तीची गरज असून वित्तीय तूट कमी करण्याची गरज आहे, त्यासाठी ठोस पतधोरण आखायला हवे.
- वर्षाच्या नंतरच्या काही महिन्यांमध्ये निर्यातीमध्ये झालेल्या वाढीमध्ये चालू खात्यातील तूट कमी झाली आहे.
- २०१२ - १३ मध्ये चालू खात्यातील तूट जीडीपीच्या ४.७ टक्के होती, जी २०१३ - १४ मध्ये १.७ टक्के इतकी कमी झाली आहे.
- वित्तीय तूटदेखील कमी होत आहे. २०११ - १२ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ५.७ टक्के होती, जी २०१२ - १३ मध्ये ४.९ टक्के व २०१३ - १४ मध्ये ४.५ टक्के इतकी कमी झाली आहे.
- खाण उद्योग व उत्पादन क्षेत्राची कामगिरी गेल्या दोन वर्षांमध्ये निराशाजनक झाली असून या क्षेत्रांची वाढ विशेष झालेली नाही.
- अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी औद्योगिक क्षेत्राला बळ देण्याची आवश्यकता आहे.
- कृषि क्षेत्राची वाढ समाधानकारक झाली आहे. १९९९ - २००० ते २०१२ - १३ या दशकभरात कृषिक्षेत्राच्या उत्पन्नाची सरासरी वाढ ३ टक्के होती, जी २०१३ - १४ या आर्थिक वर्षात ४.७ टक्के झाली आहे.
- २०१३ - १४ या आर्थिक वर्षात अन्नधान्याचे उत्पादन २६४.४ दशलक्ष टन इतके विक्रमी झाले आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता ही वाढ जवळपास २० दशलक्ष टन आहे.
- नॅशनल पेन्शन स्कीममध्ये ६७.११ लाख नागरिकांनी सहभाग घेतला असून सध्याचा निधी ५१.४४ कोटी रुपये आहे.
- महागाईचा २०१३ - १४ मध्ये कमी होऊन ५.९८ टक्के झाला.
- शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या ३.३ टक्के झाला, जो गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे.
- गरीबांचे प्रमाण घसरले असून आता ते लोकसंख्येच्या २१.९ टक्के आहे.
- आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधांवर भर आणि गुंतवणूक यावर भर देण्याची गरज.
- सेवा क्षेत्राची भरीव कामगिरी झाली असून सेवा जीडीपीचा विचार केला तर जगातल्या टॉपच्या १५ देशांमध्ये भारत १२व्या स्थानावर.
- भारताच्या सेवा क्षेत्राच्या वाढीचा विचार केला तर वाढीचा दर जगात दुस-या स्थानावर.
- दुधाचे उत्पन्न विक्रमी झाले असून तर वर्षाला १३२४३ दशलक्ष टन झाले आहे.
- भारताची आयात ८.३ टक्क्यांनी घसरली आहे.
- कृषिक्षेत्राला देण्यात आलेल्या कर्जात विक्रमी वाढ झाली असून ते ७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले.
- भारताच्या परकीय गंगाजळीत वाढ. मार्च २०१३मध्ये २९२ अब्ज डॉलर असलेली परकीय गंगाजळी मार्च २०१४मध्ये ३०४.२ अब्ज डॉलर झाली आहे.
- चालू खात्यातली तूट २०१२ - १३मध्ये ८८.२ अब्ज डॉलर होती जी घटून ३२.४ अब्ज डॉलर झालेली आहे.