नवी दिल्ली - महाराष्ट्रातील मतदार यादीवर आक्षेप घेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांवर आज केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी खुलासा केला. जेव्हा निवडणूक कार्यालयाकडून मसुदा यादी प्रसिद्ध केली गेली, त्याचवेळी दावे आणि आक्षेप का सादर केले नव्हते? परंतु जेव्हा निकाल लागला तेव्हा ते चुकीचे होते ही आठवण झाली. आजपर्यंत एकही मतदाराबाबत घेतलेले आक्षेप पुराव्यासह महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांना मिळाले नाहीत असा खुलासा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात निवडणूक होऊन आज ८ महिने झाले, मग सर्वोच्च न्यायालयात एकही याचिका दाखल का केली नाही? शेवटच्या काही तासांत मतदान वाढले असा आरोप केला, त्यालाही निवडणूक आयोगाने उत्तर दिले. जर १० तास मतदान झाले तर प्रत्येक तासाला सरासरी १० टक्के मतदान वाढते. अखेरच्या तासांत १० टक्क्याहून कमी मतदान झाले हे कशावरून सांगता? एखादी गोष्ट तुम्ही दहावेळा, वीस वेळा बोलला म्हणून ते सत्य होईल असं नाही. सत्य हे सत्यच राहते, सूर्य पूर्वेलाच उगवतो, कुणाच्या सांगण्यावरून पश्चिमेला उगवत नाही असा टोला त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसला लगावला.
तर मतचोरीच्या आरोपांवरूनही निवडणूक आयोगाने उत्तर दिले. भारतात ज्या नागरिकाचं वय १८ वर्ष पूर्ण असेल त्याने मतदार बनणे आणि मत द्यायला हवे. सर्व राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाकडे असते. त्यामुळे कुठल्याही पक्षाबाबत चुकीची भावना निवडणूक कसे ठेऊ शकेल? दुबार मतदान आणि मतचोरी या निराधार आरोपांमुळे ना निवडणूक आयोग, ना मतदार घाबरला आहे. १ कोटीहून अधिक निवडणूक कर्मचारी काम करताना इतक्या पारदर्शकतेमध्ये मतचोरी होऊ शकते का? असा सवाल ज्ञानेश कुमार यांनी विचारला आहे.
दरम्यान, कोण कोणत्या पक्षाशी संबंधित आहे याचा आम्हाला फरक पडत नाही. निवडणूक आयोग संविधानिक कर्तव्यापासून मागे हटणार नाही. राजकीय पक्षांमध्ये निवडणूक आयोग भेदभाव करत नाही. जेव्हा मतदार मसुदा यादी तयार होते तेव्हा सर्व राजकीय पक्षांना दिली जाते. अंतिम यादीही राजकीय पक्षांना मिळते. ती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर असते. मतदान केंद्रावर यादी दिली जाते. प्रत्येक उमेदवाराकडे एक पोलिंग एजेंट असतो. ती यादी त्याच्याकडेही असते. निकाल घोषित झाल्यानंतर ४५ दिवसांत उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. निकालाला आव्हानही दिले जाऊ शकते. कुठल्याही पक्षाला ४५ दिवसांत काही चूक दिसली नाही तर आज इतक्या दिवसांनी या प्रकारचे आरोप करण्यामागे त्यांचा हेतू काय हे देशातील जनतेला माहिती आहे असंही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं.
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदार हक्क यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत पुन्हा एकदा त्यांनी महाराष्ट्रातील मतदानावर भाष्य केले. भाजपा-आरएसएस संविधान मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे जिथे निवडणुका होतात, तिथे तिथे त्यांचा विजय होतो. आम्ही थोडी चौकशी केली, तेव्हा आम्हाला आढळले की, महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने जादूने १ कोटी मतदार निर्माण केले. जिथे जिथे नवीन मतदार आले, तिथे तिथे भाजपा युती जिंकली. भाजपला सर्व नवीन मतदारांकडून मते मिळाली असं त्यांनी म्हटलं.