नथुराम गोडसेंच्या वक्तव्यावरून खा. साक्षी महाराजांचे घुमजाव
By Admin | Updated: December 11, 2014 16:31 IST2014-12-11T16:19:09+5:302014-12-11T16:31:21+5:30
नथुराम गोडसे हे राष्ट्रभक्त होते असं वक्तव्य करत भाजपाचे आमदार साक्षी महाराज यांनी विरोधकांना टीकास्त्र सोडण्याची आयती संधी दिली आहे.

नथुराम गोडसेंच्या वक्तव्यावरून खा. साक्षी महाराजांचे घुमजाव
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - नथुराम गोडसे हे राष्ट्रभक्त होते असं वक्तव्य करत भाजपाचे आमदार साक्षी महाराज यांनी विरोधकांना टीकास्त्र सोडण्याची आयती संधी दिली आहे. काही संघटनांनी नथुराम गोडसेंच्या स्मरणार्थ शौर्य दिवस साजरा केला असता त्यावेळी भाजपाचे दोन माजी खासदार आणि हरीयाणातील काही धर्मगुरु त्यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात नथुराम गोडसे राष्ट्रभक्त असल्याचे साक्षी महाराज यांनी म्हटले होते. याबद्दल साक्षी महाराजांना विचारले असता त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. तसेच तो कार्यक्रम कशासाठी होता हे आपल्याला आठवत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
गांधींची हत्या करणा-या गोडेस बद्दल देशवासीयांची जी भावना आहे तीच माझी आहे असे साक्षी महाराजांनी म्हटले आहे. मी जर चुकून असे काही म्हटले असेल तर मी माझे वक्तव्य मागे घेतो असेही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.
या वक्तव्यावरून काँग्रेसच्या खासदारांनी राज्यसभेत गदारोळ घालत त्यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी शून्य प्रहारात भाजपावर टीका करत भाजपा विकासाच्या गोष्टी करत असून प्रत्यक्ष मात्र समाजात दुही पसरवण्याचे काम करत आहे. असे म्हटले आहे. तसेच महात्मा गांधींची हत्या करणा-या नथुराम गोडसेंच्या स्मरणार्थ काही संघटनांनी शौर्य दिवस आयोजीत केला होता. त्या कार्यक्रमाला भाजपाचे माजी खासदार आणि धर्मगुरुंची उपस्थिती होती, याबाबत आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत विचारणा करणार असल्याचे दलवाई यांनी म्हटले आहे. महात्मा गांधींची हत्या करणारा कोणीही असो आम्ही त्याचा आदर करणार नाही. असे म्हणत संसदीय कामकाज राज्य मंत्री मुख्तार अब्बास नाक्वी यांनी प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला. सभागृहात दोन्हीबाजूंनी गदारोळ झाल्याने पी.जे कुरीयन यांनी १० मिनिटांसाठी सभा तहकूब केली. महात्मा गांधींच्या हत्याकरणा-या व्यक्तीची प्रशंसा करण्याचा प्रश्नच उद्भवत नसून यामुळे कोणत्याही एका संस्थेला वेठीस धरणे चुकीचे आहे, हे प्रकरण इथेच थांबायला हवे अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडु यांनी केली.