मृतांचे अवयव विकून इसिसची कमाई?
By Admin | Updated: February 20, 2015 02:11 IST2015-02-20T02:11:13+5:302015-02-20T02:11:13+5:30
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (इसिस) ठार मारण्यात आलेल्या नागरिकांचे अवयव विकून पैसा मिळवत असल्याच्या दाव्याची संयुक्त राष्ट्रे शहानिशा करीत आहे.

मृतांचे अवयव विकून इसिसची कमाई?
न्यूयॉर्क : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (इसिस) ठार मारण्यात आलेल्या नागरिकांचे अवयव विकून पैसा मिळवत असल्याच्या दाव्याची संयुक्त राष्ट्रे शहानिशा करीत आहे. काही मृतदेहांचे तुकडे झाल्याचे आम्हाला आढळले, त्याचा अर्थ त्यातून काही अवयव काढून घेण्यात आले, असे संयुक्त राष्ट्रांतील इराकचे राजदूत मोहंमद अल्हाकिम यांनी म्हटले आहे.
सगळ्या मानवी मूल्यांची या दहशतवाद्यांनी विटंबना केली असून त्यांनी शिया, सुन्नी, ख्रिश्चन, तुर्कमेन, शबाक किंवा इझादीस अशा इराकी नागरिकांविरुद्ध अत्यंत घृणास्पद कृत्य केले आहे, असे अल्हाकिम म्हणाले. मृतदेहांची मागची बाजू (जेथे मूत्रपिंड असते) उघडण्यात आली असल्याचे दिसते. हे सगळेच आपल्या कल्पनेपेक्षाही फार मोठे असल्याचे अल्हाकिम यांनी सांगितले.
मानवेतविरुद्धच्या या गुन्हेगारांना आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेद्वारे शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अल्हाकेम यांनी केली आहे. दरम्यान, इराकमध्ये जानेवारी २०१५ मध्ये ७९० लोक दहशतवाद्यांकडून ठार झाल्याचे इराकमधील संयुक्त राष्ट्रांचे मावळते राजदूत निकोलाय म्लादिनोव्ह यांनी परिषदेला सांगितले. (वृत्तसंस्था)