Rajnath Singh takes jibe at Rahul Gandhi : हिवाळी अधिवेशनात अनेक दिवसांच्या सततच्या गदारोळानंतर आज राज्यघटनेवर चर्चा सुरू झाली तेव्हा पहिले भाषण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे होते. लोकसभेत संविधानावरील चर्चेला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरुवात केली. ७५ वर्षांपूर्वी संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम पूर्ण केले होते. संविधान सभेने तयार केलेली राज्यघटना केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून ती लोकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याचे यावेळी मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर संविधानाची अवहेलना करून त्यावर सत्ता निवडल्याचा आरोप केला आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. एक नेता संविधानाची प्रत खिशात ठेवून फिरत असतो, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
"संविधानाच्या माध्यमातून देशात खऱ्या अर्थाने लोकशाही लागू झाली आहे. आपली राज्यघटना सार्वत्रिक आहे, त्यात राज्याच्या जबाबदाऱ्यांची यादी तर आहेच, शिवाय त्यात नागरिकांच्या हक्कांचाही उल्लेख आहे. आपली राज्यघटना सहकारी लोकशाहीची खात्री देते आणि राष्ट्राची एकात्मताही सुनिश्चित करते. भारतीय राज्यघटना हा देशाचा अभिमान प्रस्थापित करण्याचा रोडमॅप देखील आहे, " असं राजनाथ सिंह म्हणाले. सावरकर आणि भगतसिंग यांसारख्या संविधान सभेचा भाग नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या विचारांनीही राज्यघटना मजबूत केल्याचेही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
"काही लोक आपली राज्यघटना ही केवळ चांगल्या गोष्टींचा संग्रह मानतात. गेल्या काही वर्षांपासून संविधान ही एकाच पक्षाची देणगी आहे, असे वातावरण देशात निर्माण झाले आहे. संविधान निर्मितीत अनेकांची भूमिका नाकारली गेली आहे. विशिष्ट पक्षाचे एक नेते आपल्या खिशात संविधानाची प्रत घेऊन फिरतात. खरे तर हेच त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून शिकलं आहे," असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं. राजनाथ सिंह यांचा हा टोमणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना होता असं म्हटलं जात आहे.
यावेळी राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाही किस्सा सांगत राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतला. "अटलबिहारी वाजपेयी १९९५ मध्ये जिनिव्हाला गेले होते. त्यांनी तत्कालीन सरकारच्या पावलांचे कौतुक करत भारताची बाजू मांडली. इतकंच नाही तर भारतात परतल्यावर त्यांनी इथेही तेच सांगितलं. आज परिस्थिती अशी आहे की विरोधी नेते परदेशात जाऊन भारताविरुद्ध बोलतात," असं राजनाथ सिंह म्हणाले.