नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे देशातील न्यायालयात गेल्या अनेक महिन्यांपासून व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून खटल्यांची सुनावणी सुरू आहे. अशा परिस्थितीत आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायालयात पूर्वीप्रमाणे उपस्थित राहून सुनावणीची व्यवस्था लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असे एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान म्हटले.
एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील महाबीर सिंह यांनी मी देवाला प्रार्थना करेन की पुढच्या वेळी हा खटला सुनावणीसाठी येईल तेव्हा सर्वोच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी व्हावी, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, देशात लवकरात लवकर लसीकरण होवो आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा प्रत्यक्ष सुनावणी सुरू होवो, हीच देवाकडे प्रार्थना आहे. सर्वोच्च न्यायालयात मार्च २०२० पासून व्हर्च्युअल सुनावण्या सुरू आहेत.