लष्कर भरती परीक्षेदरम्यान चीटिंग टाळण्यासाठी उमदेवारांना द्यावी लागली अंडरवेअरवर परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 13:38 IST2016-03-01T09:00:47+5:302016-03-01T13:38:48+5:30
बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये लष्कराच्या परीक्षेदरम्यान चीटिंग टाळण्यासाठी उमेदवारांना अंतर्वस्त्राशिवाय सर्व कपडे काढण्याचे आदेश देण्यात आले.

लष्कर भरती परीक्षेदरम्यान चीटिंग टाळण्यासाठी उमदेवारांना द्यावी लागली अंडरवेअरवर परीक्षा
>ऑनलाइन लोकमत
मुझफ्फरपूर, दि. १ - लष्कर वा पोलिसांच्या भरती परीक्षेदरम्यान तुम्ही उमेदवारांना हाफ पँटमध्ये मध्ये धावताना अनेक वेळा पाहिलं असेल मात्र बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये लष्कराच्या परीक्षेदरम्यान एक वेगळाच नजारा बघायला मिळाला. हे उमेदवार केवळ अंतर्वस्त्र घालून परीक्षा देत होते, परीक्षेदरम्यान कोणीही चीटिंग अथवा कॉपी करू नये यासाठी लष्करातर्फेच हा धक्कादायक आदेश देण्यात आला होता.
रविवारी मुझफ्फरपूरमध्ये लष्करात क्लार्क भरती करण्यासाठी परीक्षा घेण्यात आली, सुमारे ११५० उमेदवार या परीक्षेसाठी बसले होते. मात्र परीक्षा केंद्रावर सर्व उमदेवारांना अंतर्वस्त्र वगळता अंगावरील सर्व कपडे काढून तशीच परीक्षा देण्याचा आदेश लष्कराच्या अधिका-यांतर्फे देण्यात आला. परीक्षेच्या तणावात असलेल्या सर्व उमेदवारांना या आदेशामुळे धक्काच बसला.गेल्या वेळी घेण्यात आलेल्या परीक्षेत अनेक उमदेवार कॉपी करताना आढळले होते, यावेळेस त्या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व कोणीही कॉपी करू नये यासाठीच असा आदेश दिल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले.
या आदेशामुळे सर्व उमदेवारांना खुल्या मैदानात अर्धनग्न अवस्थेत जमिनीवर बसून उत्तरपत्रिका लिहावी लागली. जमीन ओबडधोबड असल्याने अनेकांना उत्तर लिहीताना बराचा त्रासही झाला. याप्रकरणी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी लष्कर प्रमुख दलबीर सिंग यांच्याकडून अहवाल मागवला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.