ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह गंभीर गैरवर्तन : सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 08:22 AM2022-01-29T08:22:13+5:302022-01-29T08:24:50+5:30

चालकाचा मृत्यू झाल्यामुळे बडतर्फी सक्तीच्या निवृत्तीत बदलली

Drunk and Drive Serious Abuse: Supreme Court | ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह गंभीर गैरवर्तन : सर्वोच्च न्यायालय

ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह गंभीर गैरवर्तन : सर्वोच्च न्यायालय

googlenewsNext

खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : दारू पिऊन वाहन चालविण्याची परवानगी कोणालाही नाही. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आणि इतरांच्या जीवाशी खेळणे हे अत्यंत गंभीर गैरवर्तन आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.ब्रिजेश चंद्र द्विवेदी हे फतेहपूर येथे प्रोव्हिन्शिअल आर्म्ड कॉन्स्टब्लरीमध्ये (पीएसी) चालक होते. दि. २ फेब्रुवारी २००० रोजी ते कुंभमेळ्यासाठी फतेहपूरहून अलाहाबादला पीएसी जवानांना घेऊन जाणारा लष्करी ट्रक चालवत होते. यावेळी त्यांनी मागच्या बाजूने एका जीपला धडक दिली. वैद्यकीय तपासणीत त्यांनी दारूचे सेवन केले होते व दारुच्या प्रभावाखाली असल्याचे आढळले. त्यांची विभागीय चौकशी करण्यात येऊन त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

या बडतर्फीला उच्च न्यायालयात ब्रिजेश चंद्र द्विवेदी यांनी आव्हान दिले. तेव्हा असा युक्तिवाद केला की, बडतर्फीची शिक्षा गुन्ह्यापेक्षा खूप जास्त आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. दरम्यान,  ब्रिजेश चंद्र यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोठे नुकसान झाले नसून, हा किरकोळ अपघात होता म्हणून थोडी उदारता दाखवावी. बडतर्फीच्या आदेशाचे सक्तीच्या निवृत्तीमध्ये रूपांतर व्हावे, अशी प्रार्थना ब्रिजेश चंद्र यांच्यातर्फे करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने दारू पिऊन ट्रक चालवला हे सिद्ध झाले आहे. दारूच्या नशेत पीएसी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारा ट्रक चालविणे हे अतिशय गंभीर गैरवर्तन आहे. अशी अनुशासनहिनता खपवून घेतली जाऊ शकत नाही आणि तीही शिस्तबद्ध लष्करात, असे मत नोंदवले. 

जीवघेणा अपघात झाला नाही हे नशीब

 केवळ मोठे नुकसान झाले नसल्यामुळे आणि तो किरकोळ अपघात होता हे कारण असू शकत नाही. जीवघेणा अपघात झाला नाही हे नशीब. ट्रकमधून प्रवास करणाऱ्या पीएसी कर्मचाऱ्यांचा जीव ड्रायव्हरच्या हाती होता. त्याने त्यांच्या जीवाशी खेळ केला असे म्हणता येईल, असे निरीक्षण 
नोंदवले. ब्रिजेश चंद्र यांचा मृत्यू झाला असल्यामुळे बडतर्फीची शिक्षा सक्तीच्या निवृत्तीमध्ये बदलली जावी.
न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि बी. व्ही. नागरथना, सर्वोच्च न्यायालय

Web Title: Drunk and Drive Serious Abuse: Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.