संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरुवातीपासूनच गदारोळात आहे. उद्योगपती अदानी यांच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर विरोधक सातत्याने हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, निषेधार्थ विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ब्लू कलरच्या कपड्यांमध्ये संसदेत पोहोचल्या आहेत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज निळ्या रंगाचा टी-शर्ट घालून संसदेत पोहोचले. प्रियांका गांधी यांनीही निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्याबाबत प्रियांका गांधी म्हणाल्या की, आंबेडकरांचा संसदेत अपमान झाला आणि आता ते ट्विटर हँडलवरही काहीतरी लिहित आहेत. त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. राज्यघटना बदलणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. राज्यघटनेच्या निर्मात्याबद्दल असे बोलल्यावर त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार?, असा सवालही त्यांनी केला.
कुलगाम इथं दहशतवादी अन् सैन्य दलात मोठी चकमक; ५ दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरू
या संदर्भात इंडिया आघाडी आज निषेध मोर्चा काढणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात इंडिया आघाडी राज्यसभेवर निषेध मोर्चा काढणार असून, त्यांच्या राजीनाम्याची आणि माफीची मागणी करणार आहे. संसदेतील आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मकरद्वारपर्यंत हा मोर्चा निघणार आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. संपूर्ण यंत्रणा त्यांना वाचवण्यात गुंतलेली आहे. गृहमंत्र्यांनी जे सांगितले त्याबद्दल आम्ही बोलत आहोत. त्यांच्या शब्दांना मुरड घातली गेली नाही. माफी मागण्याऐवजी धमक्या देत आहेत. त्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, असंही काँग्रेसने म्हटले आहे.
राज्यसभेत संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने आंबेडकरांचा अवमान केल्याच्या आरोपावरून बुधवारी सायंकाळी अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसला कोंडीत पकडताना ते म्हणाले की, ते स्वप्नातही आंबेडकरांचा अपमान करू शकत नाहीत.
अमित शाह म्हणाले की, संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये देशाचा ७५ वर्षांचा अभिमान वाटचाल, विकास प्रवास आणि उपलब्धी यावर चर्चा करण्यात आली. संसदेत पक्ष आणि विरोधक आहेत आणि लोकांची स्वतःची मते असणे स्वाभाविक आहे. पण संसदेत जेव्हा चर्चा होते तेव्हा ती वस्तुस्थिती आणि सत्यावर आधारित असावी. पण काँग्रेसने ज्या पद्धतीने वस्तुस्थिती मांडली आणि विपर्यास केला त्याचा मी तीव्र निषेध करतो.