Multi-Influence Ground Mine: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच भारत सातत्याने आपल्या शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेत आहे. सोमवारी, भारताने संरक्षण क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदलाने स्वदेशी विकसित मल्टी-इन्फ्लुएन्स ग्राउंड माइन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या कामगिरीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय नौदलाचे कौतुक केले आहे.
डीआरडीओने माइन क्षेपणास्त्राच्या या चाचणीमुळे आता पाकिस्तानी नौदलाला भारतीय सागरी क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा लागणार आहे. पाकिस्तानी नौदलाची एक चूक त्यांच्या युद्धनौकेची किंवा पाणबुडीची शेवटची चूक ठरू शकते. डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे मल्टी-इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची यशस्वी चाचणी घेतली आहे. विशाखापट्टणम येथील नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा आणि डीआरडीओ प्रयोगशाळेने संयुक्तपणे हे माइन क्षेपणास्त्र विकसित केले आहे. या नवीन माइनमुळे भारतीय नौदलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शत्रूचे कोणतेही गुप्त जहाज असो किंवा पाणबुडी, या माइन क्षेपणास्त्रातून सुटू शकणार नाही.
कशी काम करते मल्टी-इन्फ्लुएन्स ग्राउंड माइन?
भारतीय नौदलात आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या माइन वापरल्या गेल्या आहेत. पण आता वेगवेगळ्या माइन्सची वैशिष्ट्ये एकाच माइनमध्ये तयार करण्यात आली आहे. मल्टी-इन्फ्लुएन्स ग्राउंड माइन ३ प्रकारच्या सेन्सर इनपुट तंत्रज्ञानावर काम करते. प्रेशर टेक्नॉलॉजीनुसार, माइन सामान्य दाबाखाली पाण्यात तरंगते. पण जर एखादे जहाज किंवा पाणबुडी त्या माइनच्या जवळून गेली तर माइनवरील पाण्याचा दाब वाढतो. सेन्सर्सना हा बदल लगेच कळतो. दुसरे तंत्रज्ञान म्हणजे चुंबकीय प्रभाव, ज्यामध्ये ते पाण्यातील धातूची हालचाल ओळखते. तिसरा म्हणजे अकॉस्टिक इन्फ्लुएन्स. या माईनचे सेन्सर्स ध्वनी आणि त्यामुळे होणाऱ्या कंपनांना कॅप्चर करतात आणि ट्रॅक करतात. जर माईन विशिष्ट ध्वनी लहरी किंवा कंपनावर सेट केली असेल आणि कोणत्याही जहाजाच्या किंवा पाणबुडीच्या प्रोपेलरमधून येणारा आवाज मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तो सक्रिय होतो आणि फुटतो. नौदलाने आतापर्यंत वापरलेल्या सर्व माईन या तीन तंत्रज्ञानावर आधारित आहेत. मात्र ही नवीन माईन तिन्ही गोष्टींना एकत्र करते.
ही देशातील पहिली मल्टी-इन्फ्लुएन्स स्मार्ट नेव्ही माईन आहे जी लो सिग्नेचर डिटेक्शन तंत्रज्ञानाने तयार केली आहे. ज्यामुळे ती शत्रूच्या रडार किंवा सोनारपासून लपवता येते. ही माईन स्मार्ट अॅक्टिव्हेशन लॉजिकवर काम करते. एमआयजीएम क्षेपणास्त्राची ही चाचणी भारताच्या संरक्षण यंत्रणेला अधिक बळकटी देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. हे माईन क्षेपणास्त्र अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. चाचणी दरम्यान या माईन क्षेपणास्त्राने ते किती अचूक असल्याचे दाखवून दिलं.