Dr. S. Jaishankar on India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, यापुढे पाकिस्तानशी चर्चा होणार असेल, तर ती फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच होईल. दोन्ही देशांमधील अंतर्गत मुद्द्यांमध्ये तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.
दिल्लीतील होंडुरास दूतावासाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये असा करार आहे की, आमचे संबंध आणि व्यवहार पूर्णपणे द्विपक्षीय असतील. यामध्ये अजिबात बदल झालेला नाही. आमचे मुद्दे आम्ही सोडवू, यात तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही.
जयशंकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानशी चर्चा फक्त दहशतवादावर आणि पीओकेवरच होईल. पाकिस्तानने दहशतवादी पायाभूत सुविधा बंद केल्या पाहिजेत. आम्ही त्यांच्याशी फक्त दहशतवादावर चर्चा करण्यास तयार आहोत. काश्मीरवर चर्चेसाठी एकमेव मुद्दा म्हणजे पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या काश्मीरमधील भारतीय भूभाग रिकामा करावा, असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले.
सिंधू पाणी करार स्थगितच राहणारपरराष्ट्रमंत्र्यांनी सिंधू करारवरही प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानसोबतच्या तणावपूर्ण परिस्थितीत आम्हाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला आहे. आमच्याकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव होता की, गुन्हेगारांना जबाबदार धरले पाहिजे आणि 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरद्वारे त्यांना जबाबदार धरण्यात आले. पाकिस्तानसोबतच्या सिंधू पाणी कराराशी संबंधित एका प्रश्नावर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, सिंधू पाणी करार स्थगित आहे आणि जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत तो स्थगितच राहील.
भारत-अमेरिका व्यापार संबंध...भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराबाबत सध्या चर्चा सुरू आहे, येत्या काही दिवसांत यावर अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे. भारताने अमेरिकेला झिरो टॅरिफची ऑफर दिल्याचे ट्रम्प यांचे म्हणने आहे. त्यांच्या या दाव्यानंतर जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार चर्चा सुरू आहेत. या गुंतागुंतीच्या चर्चा आहेत. सर्वकाही अंतिम होईपर्यंत काहीही सांगणे कठीण आहे. कोणताही व्यापार करार परस्पर फायदेशीर असला पाहिजे; तो दोन्ही देशांसाठी कार्य करणारा असावा. व्यापार करारातून आपण हीच अपेक्षा करू शकतो. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत यावर कोणताही निर्णय घेणे घाईचे ठरेल, असे ते म्हणाले.