"कोणाला माहितीये, कदाचित एक दिवस पाकिस्तानभारताला तेल विकेल", हे शब्द आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे! टॅरिफचे अस्त्र दाखवत भारतावर दबाव आणू पाहणाऱ्या ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत मोठे तेल साठे विकसित करण्याचा व्यापार करार केला. त्यानंतर त्यांनी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांच्या या विधानाबद्दल भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भाष्य केलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, "अमेरिकेकडून टॅरिफ संदर्भात भारत सरकारने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्यावर ठाम आहे. राहिला व्हाईट हाऊसचा प्रश्न तर याबद्दल तेच अधीक चांगलं सांगू शकतील."
'पाकिस्तानकडून भारत तेल खरेदी करेल?'
डोनाल्ड ट्रम्प यांनी कदाचित एखाद्या दिवशी पाकिस्तान भारताला तेल विकेल असे विधान केले. त्याबद्दल रणधीर जयस्वाल म्हणाले, "याबद्दल काहीही बोलायचे नाही. आम्हाला विश्वास आहे की अमेरिका भारतासोबतचे पुढेही कायम राहील."
"आम्ही पाकिस्तानसोबत एक करार केला आहे. त्यानुसार अमेरिका पाकिस्तानात एकमेकांच्या सहकार्याने मोठे तेल साठे उभारणार आहे. यासाठी आम्ही तेल कंपनीच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये आहोत. ही तेल कंपनी दोन्ही देशाच्या भागीदारीतून होणाऱ्या या कामाचे नेतृत्व करेल. कोणाला माहिती, कदाचित एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल", असे डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबतचा करार पूर्ण झाल्याची घोषणा करताना म्हटले होते.