गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये कमालीची कटुता आली आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ आकारला आहे. त्यामुळे अमेरिकेत व्यापार करणाऱ्या भारतातील उद्योगव्यवसायांवर या टॅरिफचा मोठा परिणाम दिसून येऊ लागला आहे. तसा या टॅरिफचा फटका सर्वच उद्योगांना बसला आहे. मात्र कपड्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसताना दिसत आहे. अमेरिकेतील आयातदारांकडून कोट्यवधीची मागणी रद्द करण्यात आल्याने तामिळनाडूमधील अनेक कपडे कारखान्यांनी उत्पादन बंद केलं आहे. भारतीय उद्योजकांना देण्यात येणाऱ्या ऑर्डर रद्द करण्यात येत आहेत. तसेच त्या अन्य देशांना देण्यात येत आहेत.
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे तामिळनाडूमधील तिरुपूर येथील कपडा उत्पाद करणाऱ्या कारखान्यांमधील काम थंडावले आहे. ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर बहुताश ऑर्डर स्थगित झाल्या आहेत किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भारतातील कपडे निर्यातदारांना देण्यात येणाऱ्या ऑर्डरपैकी बहुतांश ऑर्डर ह्या बांगलादेश, पाकिस्तान, व्हिएतनाम, कंबोडिया या देशांकडे वळवण्यात आल्या आहेत. या देशांवर १९ ते ३६ टक्के एवढं टॅरिफ आहे जे भारताच्या तुलनेत बऱ्यापैकी कमी आहे.
तिरुपूरमधील एका निर्यातदाराने सांगितले की, भारतामधून अमेरिकेत जाणाऱ्या बऱ्याचशा ऑर्डर आता पाकिस्तानला मिळत आहेत. अनेक अमेरिकन खरेदीदारांनी ऑर्डर स्थगित केल्या आहेत. काही निर्यातदारांनी अमेरिकेचं २५ टक्के टॅरिफ सहन करू शकतो असं म्हटलं आहे. मात्र त्याच्या दुप्पट टॅरिफ असेल तर त्याच्यासमोर निभाव लागणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे. टॅरिफ लावण्यात आल्यानंतर काही उत्पादनाच्या किमतींमध्ये ६४ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, तो आमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ३५ टक्क्यांनी अधिक असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर कपडे निर्यात करणारे बहुतांश निर्यातदार थांबा आणि वाट पाहा या तत्त्वाचा अवलंब करत आहेत. पुढे परिस्थिती कशी बदलते, याची वाट त्यांच्याकडून पाहिली जात आहे. त्यानुसार पुढील निर्णय त्यांच्याकडून घेतला जाणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार झाल्याने तिरुपूर येथील व्यापाऱ्यांना ब्रिटनमधील बाजारामधून खूप अपेक्षा आहेत.