देशांतर्गत जलवाहतूक होणार सुरक्षित; पहिल्या रिव्हर इन्फर्मेशन सिस्टीमचे उद्घाटन
By Admin | Updated: January 6, 2016 23:53 IST2016-01-06T23:53:39+5:302016-01-06T23:53:39+5:30
भारतात स्वस्त दरात आधुनिक पद्धतीची देशांतर्गत जलवाहतूक हे केंद्र सरकारचे स्वप्न असून नौकानयन मंत्रालयाने त्यासाठी वेगाने काम सुरू केले आहे.

देशांतर्गत जलवाहतूक होणार सुरक्षित; पहिल्या रिव्हर इन्फर्मेशन सिस्टीमचे उद्घाटन
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
भारतात स्वस्त दरात आधुनिक पद्धतीची देशांतर्गत जलवाहतूक हे केंद्र सरकारचे स्वप्न असून नौकानयन मंत्रालयाने त्यासाठी वेगाने काम सुरू केले आहे. देशांतर्गत जलवाहतुकीत दोन जहाजांची टक्कर अथवा पुलांच्या अर्धवट बांधकामांवर जहाजांचे आदळणे, अपघात व नैसर्गिक संकटांपासून सुरक्षित देशांतर्गत जलवाहतुकीसाठी, एअर ट्राफिक कंट्रोलच्या धर्तीवर आधुनिक रिव्हर इन्फर्मेशन सिस्टीम कार्यरत करण्यात आली आहे. भारतातील पहिली जलमार्ग नियंत्रण व्यवस्था गंगा नदीवरील हल्दिया ते फराक्का या ५४५ कि.मी अंतराच्या जलमार्गावर कार्यरत झाली असून त्याचे औपचारिक उद्घाटन बुधवारी केंद्रीय जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते दिल्लीच्या परिवहन मंत्रालयात पत्रकारांच्या उपस्थितीत झाले.
देशांतर्गत जलवाहतूक नगण्य
उद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, जगातल्या प्रमुख देशांच्या तुलनेत भारतात देशांतर्गत जल वाहतुकीचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. रस्ता वाहतुकीचा खर्च सरासरी १.५० रुपया प्रति कि.मी. तर रेल्वे वाहतुकीचा १ रुपया प्रति कि.मी. येतो. त्या तुलनेत जलवाहतुकीचा खर्च अवघा २५ ते ३० पैसे प्रति कि.मी. आहे. देशातील बरीचशी प्रवासी व मालवाहतूक जलमार्गाने केल्यास मोठ्या नद्यांलगत नव्या औद्योगिक वसाहती, शीतगृहे व प्री-कुलिंग केंद्रे उभी राहतील. कृषी उत्पादनांच्या स्वस्त वाहतुकीबरोबरच नवे रोजगारही त्यातून निर्माण होऊ शकतील.
भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची अशी जलवाहतूक लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाने वेगाने प्रयत्न सुरू केले असून त्यात अग्रक्रमाने गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, आंध्रप्रदेश व तामिळनाडू दरम्यानचा बकिंगहॅम कॅनॉल व केरळचे बॅकवॉटर अशा पाच देशांतर्गत जलमार्ग वाहतुकीचे काम सुरू झाले आहे.