नवी दिल्ली : अमेरिकेने फोर्डो अणुकेंद्रावर जीबीयू-५७/ए या प्रचंड बंकर बस्टर बॉम्बने हल्ले केले. त्यामुळे इराणच्या अणुकार्यक्रमाचे खूप मोठे नुकसान झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत हा अग्नि-५ क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती विकसित करत आहे. या क्षेपणास्त्रात सात हजार किलो वजनाचा बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता असणार आहे.
डीआरडीओ ही संस्था तयार करत असलेल्या अग्नि-५च्या सुधारित आवृत्तीचे क्षेपणास्त्र डागल्यानंतर जमिनीखालील ८० ते १०० मीटरपर्यंत खोलवर असलेल्या लक्ष्यावर अचूक मारा करू शकते. हे क्षेपणास्त्र बंकरखालील मजबूत संरचनांवर हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. इराणविरोधात अमेरिकेने वापरला तसा बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेण्यासाठी भारत क्षेपणास्त्र बनवित आहे.
शक्तिशाली प्रणाली
पाकिस्तान, चीनसारख्या देशांतील क्षेपणास्त्र तळ व संरक्षणदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी अग्नि-५च्या बंकर बस्टर बॉम्ब वाहून नेणाऱ्या सुधारित आवृत्त्या खूप उपयोगी ठरतील असे संरक्षणतज्ज्ञांचे मत आहे.
ही क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या बंकर बस्टर प्रणालींहून शक्तिशाली असतील.
अमेरिकेच्या युद्धनीतीचे अनुकरण
बदललेल्या युद्धनीतीनुसार अमेरिका बंकर बस्टरसारख्या गोष्टींचा उपयोग करून अचूक लक्ष्यभेद करते. अशा प्रकारे संरक्षणसज्ज राहणे हे तुलनेने कमी खर्चिक आहे. भारत आता याच युद्धनीतीचे अनुकरण करत आहे.
भारत अग्नि-५ या क्षेपणास्त्राच्या दोन नव्या आवृत्त्या विकसित करत आहे. त्यातील एक प्रकारच्या क्षेपणास्त्राने जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करता येईल. तर दुसऱ्या प्रकारच्या क्षेपणास्त्राने जमिनीखालील गोष्टींवर मारा करता येणार आहे.
अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांच्या मारक क्षमतेत काही प्रमाणात घट झाली असली तरी त्यांची विनाशकारी शक्ती व अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता यामुळे ती क्षेपणास्त्रे भारतासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहेत.