दरवाजा तोडून केली दस्तऐवजांची चोरी
By Admin | Updated: February 22, 2015 23:46 IST2015-02-22T23:46:41+5:302015-02-22T23:46:41+5:30
पेट्रोलियम मंत्रालयातील गोपनीय दस्तऐवज चोरी प्रकरणाला ‘कंपनी हेरगिरी’ असे नाव देत बड्या औद्योगिक समूहांचे नाव जोडले

दरवाजा तोडून केली दस्तऐवजांची चोरी
नवी दिल्ली : पेट्रोलियम मंत्रालयातील गोपनीय दस्तऐवज चोरी प्रकरणाला ‘कंपनी हेरगिरी’ असे नाव देत बड्या औद्योगिक समूहांचे नाव जोडले गेल्यामुळे खळबळ उडाली असतानाच, मंत्रालयातील एका संचालकाच्या कक्षाचे तुटलेले दार बघून तपास अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण अडाणी अशिक्षित लोकांकडूनच अशा प्रकारची चोरी केली जाऊ शकते. अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू असण्याचा अंदाज आहे.
आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार सांभाळल्यानंतर काही दिवसांतच एका सकाळी मंत्रालयात एका दस्तऐवजाची प्रत झेरॉक्स मशीनमध्ये पडलेली दिसली. शास्त्री भवनात अनेक प्रमुख मंत्रालये असून, तेथील छोट्या खोल्या आणि अरुंद कॉरिडॉरमध्ये ठेवलेले अनेक दस्तऐवज कंपनी किंवा लॉबिस्टच्या सहज हातात लागू शकतात.
बनावट चावी आणि ओळखपत्र
रात्री उशिरा दस्तऐवज चोरण्यासाठी नकली चावी आणि बनावट ओळखपत्रांचा वापर केला जात होता. ओळखपत्राच्या आधारे खोलीत प्रवेश केल्यानंतर राजरोसपणे चोरी चालत होती. दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा असून तो झाकण्यासाठी दस्तऐवज गहाळ करण्याचे काम माझ्याकडे सोपविण्यात आले होते, असा दावा मुख्य आरोपी शांतनू सैकिया याने केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)