मुळव्याध बरा करण्यासाठी पारंपरिक उपचार पद्धतीमधील औषध देणाऱ्या वैद्याकडील सिक्रेट फॉर्म्युला मिळवण्यासाठी त्याचं अपहरण करून नंतर हत्या करण्यात आल्याची तसेच या गुन्ह्याचा सुगावा लागू नये म्हणून मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या झाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी एका चोरीच्या घटनेच्या तक्रारीनंतर तपासाला सुरुवात केल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
शबा शरीब असं अपहरण करून हत्या झालेल्या वैद्याचं नाव आहे. या प्रकरणी आता कोर्टाने तीन आरोपींना सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. व्यावसायिक शैबिन अश्रफ, शिहाबुद्दीन आणि एन. निषाद अशी वैद्याची हत्या केल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीचा मृतदेह मिळालेला नाही. मात्र त्याच्या शरीराचे अवयव ज्या वाहनातून नेण्यात आले. त्यामध्ये मिळालेल्या काही केसांवरून तपास यंत्रणांनी या गुन्ह्याचा छडा लावला. या केसांची डीएनए चाचणी केल्यानंतर या प्रकरणात तो भक्कम पुरावा बनला. या प्रकरणात एकूण १५ जणांना आरोपी करण्यात आले होते. त्यापैकी ३ जणांना दोषी ठरवण्यात आले. आता दोषींना शनिवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.
याबाबत न्यायालयीन सुनावणीमधून समोर आलेल्या माहितीनुसार व्यावसायिक शैबिन आणि इतर आरोपींनी १ ऑगस्ट २०१९ रोजी वैद्य शबा शरीफ यांचं अपहरण केलं. तसेच त्यांना जवळपास १४ महिने घरात कोंडून ठेवलं. यादम्यान, मुळव्याधावरील उपचारांसाठी ते वापरत असलेला फॉर्म्युल्या मिळवण्यासाठी त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. या फॉर्म्युल्याचा व्यावसायिक वापर करून त्याद्वारे पैसे कमावण्याचा शैबिन याचा इरादा होता. त्याने शबा शरीफ यांना केरळमध्ये येण्यासाठी राजीही केलं. मात्र त्यांनी फॉर्म्युला देण्याचे नाकारताच त्यांना घरात कोंडून त्यांचा छळ केला.
दरम्यान, २०२२ साली एप्रिल महिन्यात शैबिन याने शिहाबुद्दीन, नौशाद आणि निशाद यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. तसेच ७ लाख रुपये रोख आणि लॅपटॉप चोरीला गेल्याचा आरोप केला. पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात करून आरोपींना अटक केल्यावर हत्येचं प्रकरणही उघडकीस आलं.