मतदान करत नाहीत, मग सरकारला दोषी ठरवण्याचा अधिकार नाही - सुप्रीम कोर्ट
By Admin | Updated: February 6, 2017 10:03 IST2017-02-06T09:54:12+5:302017-02-06T10:03:12+5:30
जर तुम्ही मतदान करत नाही, तर तुम्हाला सरकारला प्रश्न विचारण्याचा किंवा दोष देण्याचा अधिकार नाही', असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

मतदान करत नाहीत, मग सरकारला दोषी ठरवण्याचा अधिकार नाही - सुप्रीम कोर्ट
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - 'जर तुम्ही मतदान करत नाही, तर तुम्हाला सरकारला प्रश्न विचारण्याचा किंवा दोष देण्याचा अधिकार नाही', असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने आपले मत नोंदवले आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या धनेश इरधन यांनी सरकार अतिक्रमण काढण्याबाबत काहीच करत नाही असे सांगत, अतिक्रमण हटवण्यासंदर्भात व्यापक आदेश देण्याची मागणीही केली.
यावेळी कोर्टाने त्यांना ' तुम्ही मतदान करता का?' असा प्रश्न विचारला. त्यावर 'मतदान करत नाही', असे उत्तर इरधन यांनी दिले. यावर कोर्टाने संताप व्यक्त केला आणि मतदान करत नाही, तर सरकारला दोष देण्याचा अधिकार नाही', अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारले.
तसेच 'सुप्रीम कोर्ट अतिक्रमणांसंबंधी व्यापक आदेश जारी करू शकत नाही कारण ही प्रकरणं संबंधित राज्यांशी जोडली गेली आहेत. त्यामुळे त्या राज्यांच्या हायकोर्टात याचिका दाखल करावी लागेल', असे सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी इरधन यांच्या याचिकेबाबत सांगितले.
शिवाय, 'तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला दोषी ठरवू शकत नाही. एखादा व्यक्ती मतदान करत नसेल तर त्याला सरकारविरोधात प्रश्न उपस्थित करण्याचा मुळीच अधिकार नाही', असेही कोर्टाने त्यांना ठणकावले.