यंत्रे नको, मतपत्रिकाच वापरा
By Admin | Updated: April 11, 2017 00:42 IST2017-04-11T00:42:44+5:302017-04-11T00:42:44+5:30
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांत ईव्हीएम्समध्ये छेडछाड झाल्याच्या आरोपानंतर विरोधी पक्षांनी हा प्रश्न संयुक्तरित्या निवडणूक आयोगाकडे नेला.

यंत्रे नको, मतपत्रिकाच वापरा
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांत ईव्हीएम्समध्ये छेडछाड झाल्याच्या आरोपानंतर विरोधी पक्षांनी हा प्रश्न संयुक्तरित्या निवडणूक आयोगाकडे नेला.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊ न आगामी निवडणुकांमध्ये निम्म्या मतपत्रिका आणि व्हीव्हीपीएटीचा (मतदाराला त्याने कोणाला मत दिले त्याची चिठ्ठी) वापर केला जावा, अशी मागणी केली. विरोधी पक्षांचे नेते मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊ नही त्यांच्यापुढे आपले म्हणणे सादर करणार आहेत.
विरोधी पक्षांचे नेते सोमवारी संसदेत भेटले. यावर्षी गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत निम्म्या मतपत्रिका व निम्म्या व्हीव्हीपीएटीचा वापर करावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली. ही बैठक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या दालनात झाली. यावेळी अहमद पटेल, आनंद शर्मा, कपिल सिबल, विवेक टंखा, जनता दलाचे (यु) अली अन्वर अन्सारी, तृणमूलचे सुखेंदू शेखर रॉय, बसपचे सतीश मिश्र व सपाचे नीरज शेखर आदी उपस्थित होते.
केजरीवाल यांचा आरोप; आयोग धृतराष्ट्रासारखा वागतोय
- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील (ईव्हीएम) कथित छेडछाडीच्या आरोपांवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगावर सोमवारी जोरदार हल्ला केला. हा आयोग ध्रृतराष्ट्रासारखा वागत असून आपल्या मुलाला (भाजप) विजयासाठी मदत करीत आहे, असा दावा केला.
- आयोगाचा एकमेव हेतू हा निवडणुका होत असलेल्या राज्यांत भाजपला सत्तेत आणण्याचा आहे आणि म्हणूनच आयोग सदोष ईव्हीएम्सच्या चौकशीच्या विनंतीकडे लक्ष देत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
- ध्रुतराष्ट्र आपला मुलगा दुर्योधनाला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा तसेच निवडणूक आयोग साम, दाम, दंड आणि भेद अशा सर्व मार्गांनी भाजपला सत्ता मिळवून देण्याची मदत करीत आहे, असे ते म्हणाले. ही यंत्रे दणकट असून त्यात काहीही बदल करता येत नसल्याचा खुलासा रविवारी आयोगाने केला होता.