काळा पैसा किती ते ठाऊक नाही - पंतप्रधान
By Admin | Updated: November 3, 2014 04:15 IST2014-11-03T04:15:19+5:302014-11-03T04:15:19+5:30
देशाच्या बाहेर गेलेला गरिबांच्या हक्काचा पैसा भारतात परत आणण्यात येईल. हा काळा पैसा नेमका किती आहे, हे ठाऊक नसले तरी तो परत येईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही

काळा पैसा किती ते ठाऊक नाही - पंतप्रधान
नवी दिल्ली : देशाच्या बाहेर गेलेला गरिबांच्या हक्काचा पैसा भारतात परत आणण्यात येईल. हा काळा पैसा नेमका किती आहे, हे ठाऊक नसले तरी तो परत येईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही रविवारी आकाशवाणीच्या माध्यमातून दिली.
मोदी यांनी आकाशवाणीवरील ‘मन कि बात’ कार्यक्रमांतर्गत देशाच्या जनतेशी संवाद साधला. जर विदेशतील काळा पैसा भारतात आणला तर प्रत्येकाच्या खिशात तीन लाख रुपये येतील, असे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगणाऱ्या मोदी यांनी विदेशात नेमका किती काळा पैसा जमा आहे, याची आकडेवारी आपल्याजवळ नसल्याचे रविवारी सांगितले. ते म्हणाले, की ‘माझ्या देशवासीयांचा या प्रधान सेवकावर विश्वास आहे. हा पैसा आणण्याचे मार्ग कोणते, याबाबत मतभेद असू शकतात. लोकशाहीत असे घडत असते. मी मनापासून हे करू इच्छतो. ही माझ्या मनातली गोष्ट आहे. देशवासीयांना माझ्या शब्दांवर विश्वास आहे. विदेशात काळा पैसा नेमका किती आहे, हे मला ठाऊक नाही. या आधीच्या सरकारलाही ते माहीत नव्हते. ते कुणालाच माहीत नाही. तो एक रुपया आहे की एक लाख, की एक कोटी मला माहीत नाही. मी आकड्यात अडकणार नाही. हा काळा पैसा परत आला पाहिजे, बस्स! माझे प्रयत्न कमी पडणार नाहीत.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)