मंत्र्यांचे तोंडी आदेश पाळू नका!

By Admin | Updated: October 24, 2014 03:38 IST2014-10-24T03:38:36+5:302014-10-24T03:38:36+5:30

केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांमधील अधिका-यांनी लगेचच्या वरिष्ठांकडून लेखी निर्देश आल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये

Do not follow the oral orders of the ministers! | मंत्र्यांचे तोंडी आदेश पाळू नका!

मंत्र्यांचे तोंडी आदेश पाळू नका!

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांमधील अधिकाऱ्यांनी लगेचच्या वरिष्ठांकडून लेखी निर्देश आल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, असा ताजा फतवा पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) काढल्याने मंत्री आणि त्यांच्या स्वीय कर्मचाऱ्यांना तोंडी हुकूम सोडून कामे करून घेण्याची सवय सोडावी लागणार आहे.
‘पीएमओ’ने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या ताज्या कार्यालयीन आदेशात (ओएम) याचा समावेश असून वरिष्ठांनी तोंडी दिलेल्या आदेशाची लेखी पुष्टी केल्याशिवाय त्यानुसार पुढील पाऊल न उचलण्याचे बंधन सर्वच मंत्रालयांमधील अधिकाऱ्यांना पाळावे लागणार
आहे.
वरिष्ठांनी एखादी गोष्ट करण्याविषयी तोंडी सांगितले व तसे करणे नियमांत बसणारे असले तरीही त्याची लेखी पुष्टी करून घेण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले
आहे.
आपली मते किंवा निर्देश फाईलमध्ये लेखी न नोंदविता हवे असलेले काम तोंडी आदेश देऊन करून घेण्याची प्रवृत्ती अलीकडच्या वर्षांमध्ये मंत्र्यांमध्ये रूढ झाल्याचे दिसते. काही अधिकारी, जे काही सांगायचे ते फाईलवर लिहा, असा आग्रह धरतात; पण बऱ्याच वेळा लेखी नोंद न करताच अधिकारी मंत्र्यांच्या इच्छेनुसार कामे पार पाडतात. ‘पीएमओ’ने जारी केलेल्या या ताज्या निदेशांमुळे अशा मंत्र्यांना यापुढे अधिक सावधपणे काम करावे लागणार
आहे.
या संदर्भात पूर्वीपासूनच लागू असलेल्या; परंतु अभावानेच पालन केल्या जाणाऱ्या कार्यालयीन कामाच्या मॅन्युअलचा संदर्भ देत ‘पीएमओ’ने म्हटले आहे की, जेव्हा कोणाही अधिकाऱ्याला मंत्री किंवा त्यांच्या स्वीय कर्मचाऱ्यांकडून तोंडी निर्देश दिले जातील तेव्हा असे निर्देश नियम वा प्रस्थापित पद्धतीला धरून असले तर संबंधित अधिकाऱ्याने, आपल्या लगेचच्या वरिष्ठाच्या ते निदर्शनास आणून द्यावेत. मात्र मंत्र्यांकडून दिलेले निर्देश नियमांत बसणारे नसतील तर तशी स्पष्ट नोंद करून संबंधित अधिकाऱ्याने ती बाब खात्याच्या सचिवाकडे न्यावी.
या सर्वसाधारण नियमास अपवाद करताना मॅन्युअल म्हणते की, मंत्री आजारी किंवा दौऱ्यावर असताना एखाद्या तातडीच्या बाबीत त्यांच्याकडून फोनवरून तोेंडी निर्देश घ्यावे लागले तरी मंत्र्यांचे ते निर्देश त्यांच्या स्वीय सचिवांनी संबंधितांना लेखी कळवावे आणि मंत्री बरे झाल्यावर अथवा दौऱ्यावरून परत आल्यावर त्यांच्याकडून अशा निर्देशाची लेखी पुष्टी घेतली
जावी.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Do not follow the oral orders of the ministers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.