‘आप’मध्ये आता ‘तोडू नका, जोडा’
By Admin | Updated: March 18, 2015 00:15 IST2015-03-18T00:15:22+5:302015-03-18T00:15:22+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘तोडू नका, जोडा’ असे सांगत पक्षातील अंतर्गत कलह शमविण्याचे काम हाती घेतले.

‘आप’मध्ये आता ‘तोडू नका, जोडा’
समेटाचा प्रयत्न : संजय सिंग, कुमार विश्वास भेटले यादवांना
नवी दिल्ली : बेंगळुरूतील १२ दिवसांच्या उपचारानंतर दिल्लीला परतताच आम आदमी पार्टीचे (आप) सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘तोडू नका, जोडा’ असे सांगत पक्षातील अंतर्गत कलह शमविण्याचे काम हाती घेतले. याअंतर्गत केजरीवाल गोटातील नेत्यांनी सोमवारी रात्री उशिरा योगेंद्र यादव यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले.
प्रशांत भूषण यांनी केजरीवालांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता. मंगळवारी केजरीवालांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच भेटू, असा शब्द त्यांनी भूषण यांना दिला. केजरीवाल उपचारासाठी दिल्लीबाहेर असल्यामुळे त्यांच्या माघारी पक्षातील कलह चव्हाट्यावर आला होता. यादव व प्रशांत भूषण, तसेच केजरीवाल गट यांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप आरंभले होते.
सोमवारी रात्री उशिरा केजरीवाल गटातील संजय सिंह, कुमार विश्वास, आशुतोष आणि आशिष खेतान हे योगेंद्र यादव यांना भेटण्यासाठी पोहोचले. पहाटे तीन वाजेपर्यंत ही चर्चा सुरू होती.
ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचे यानंतर आप नेत्यांनी सांगितले. गत काही दिवसांत पक्षातील घटनाक्रमामुळे आम्ही व्यथित होतो. आम्ही योगेंद्र यादवांशी चर्चा सुरू केली. सुरुवात चांगली राहिली, अशा आशयाचे टिष्ट्वट संजय सिंह यांनी बैठकीनंतर केले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
मानहानी प्रकरणाची सुनावणी करीत असलेल्या एका न्यायालयाने फटकारल्यानंतर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच योगेंद्र यादव मंगळवारी दुपारी न्यायालयासमक्ष हजर झाले. न्यायालयाने या तिघांविरुद्ध आरोप निश्चित करण्याबाबतच्या आदेशासाठी २ मे ही तारीख निश्चित केली.
काय आहे प्रकरण
पेशाने वकील असलेले सुरेंद्र कुमार शर्मा यांनी केजरीवाल, सिसोदिया आणि यादव यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. २०१३ मध्ये आम आदमी पार्टीने आपल्याला तिकीट देण्याचा शब्द दिला होता. यानंतर आपण उमेदवारी अर्जही भरला होता; मात्र नंतर आपले तिकीट रद्द करण्यात आले होते. यानंतर मीडियाशी बोलताना या तिन्ही नेत्यांनी आपल्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केले. यामुळे आपली प्रतिमा मलिन झाली, असा आरोप शर्मा यांनी केला आहे.