जनतेला गृहित धरू नका, पाय जमिनीवर ठेवा - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: September 17, 2014 18:42 IST2014-09-17T09:17:21+5:302014-09-17T18:42:01+5:30
नऊ राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाची झालेली पिछेहाट महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे असे सांगत जनतेला गृहित धरू नका असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे.

जनतेला गृहित धरू नका, पाय जमिनीवर ठेवा - उद्धव ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - नऊ राज्यातील पोटनिवडणुकांचे निकाल हा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे असे सांगत जनतेला गृहित धरू नका असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलेल्या भाजपाला आधी बिहार व त्यानंतर उत्तर प्रदेश, राजस्थान येथील पोटनिवडणुकांत पराभव पत्करावा लागला. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपाला पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या निकालांपासून धडा घ्या, विजयाचा उन्माद चढू देऊ नका, जे हे ऐकतील तेच महाराष्ट्र काबीज करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप- शिवसेनेत सध्या जागावाटपाचा तिढा सुरू आहे. लोकसभेतील यशानंतर भाजपला आता महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची घाई असून त्यासाठीच ते निम्म्या जागांच्या मागणीसाठी आग्रही आहेत. मात्र लोकसभेत भाजपाला तर विधानसभेत शिवसेनेला अधिक जागा हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे असलेले सूत्र शिवसेना बदलण्यास तयार नाही. यामुळे भाजप नेते नाराज असून गरज पडल्यास स्वबळावर लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असून भाजपाचा करिश्मा ओसरल्याचे चित्र दिसत आहे. 'लोकसभेच्या हवेवर विधानसभा लढता येणार नाहीत' असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला वेळीच सावध होण्याचा सल्ला दिला आहे. जनतेला गृहित धरल्यास हीच जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल, असा इशाराही अग्रलेखात देण्यात आला आहे.
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
- आधी बिहारच्या पोटनिवडणुकांत व आता उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातच्या पोटनिवडणुकांत विचित्र निकाल आहेत. परंपरेने भाजपकडे असलेल्या जागांवर कॉंग्रेस किंवा ‘सपा’ने विजय मिळवावा हे जनमनाचे गूढ म्हणावे लागेल. लोकसभेत ज्याप्रमाणे दुश्मनांचे पोट फाडून भाजप विजयाचा नरसिंह बाहेर आला तसे पोटनिवडणुकांत झाले नाही.
- लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात मुसंडी मारणा-या भाजपाला पोटनिवडणुकांत मात्र यश मिळवता आले नाही. तेथील ११ जागांपैकी ९ समाजवादी पार्टीने तर २ भाजपने जिंकल्या. ‘भाजप’च्या ताब्यातील काही जागांवरही सपाने विजय मिळला. राजस्थानातही भाजपाला जोरदार धक्का बसला असून ४ पैकी ३ जागा कॉंग्रेसने जिंकल्या व १ जागा भाजपला मिळाली. मोदींच्या गुजरातमध्ये ९ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या हे खरे, पण ३ जागा कॉंग्रेसने भाजपकडून खेचून घेतल्या.
- मात्र या निकालांमुळे ‘मोदी लाट ओसरली होऽऽ’ अशा हाकाट्या सुरू झाल्या आहेत. पोटनिवडणुकांचा व मोदी लाटेचा संबंध जोडू नये. लोकसभा निवडणुका वेगळ्या व राज्याच्या निवडणुका वेगळ्या हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक निवडणुकीची हवा वेगळी असते व प्रत्येक निकालानंतर हवा बदलत जाते. लोकसभेच्या हवेवर विधानसभा लढता येणार नाहीत व विधानसभांच्या निकालांवर जिल्हा परिषदा किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका लढता येणार नाही.
- लोकांची मने चंचल असतात, त्याचा हा निर्णय आहे. पोटनिवडणुकांचे निकाल हा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे. तो सगळ्यांसाठीच आहे. जनतेला गृहीत धरू नका. पाय जमिनीवर ठेवा. विजयाचा उन्माद चढू देऊ नका व हवेवर स्वार होऊन तलवारबाजी करू नका. हा धडा जे घेतील तेच महाराष्ट्र काबीज करतील. नाहीतर जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल!