दफनविधी करायचाय, फायरिंग थांबवा ! LoC वर मशिदीने पाकिस्तानला सुनावलं
By Admin | Updated: January 2, 2017 13:35 IST2017-01-02T13:35:17+5:302017-01-02T13:35:17+5:30
दफनविधी करण्यासाठी मशिदीने मध्यस्थी करत पाकिस्तानला खरी खोटी सुनावत फायरिंग थांबवण्यास सांगितलं

दफनविधी करायचाय, फायरिंग थांबवा ! LoC वर मशिदीने पाकिस्तानला सुनावलं
>ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. 2 - जम्मू काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये गेल्या आठवड्यात वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. नियंत्रण रेषेवर करण्यात आलेल्या या शस्त्रसंधी उल्लंघनामध्ये लष्कर जवानांसोबत काही स्थानिक नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी याच नियंत्रणरेषेवर गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या एका तरुणाचा दफनविधी करण्यात आला.
16 वर्षीय तनवीरचा पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. नूरकोटे गावात नियंत्रण रेषेजवळ असणा-या आपल्या जमिनीत तनवीरचा दफनविधी करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. मात्र पाकिस्तानकडून सुरु असलेल्या सततच्या गोळीबारामुळे त्यांना साधी हालचालदेखील करायला मिळत नव्हती. शेवटी मशिदीने मध्यस्थी करत पाकिस्तानला खरी खोटी सुनावत फायरिंग थांबवण्यास सांगितलं.
'तुमच्या गोळीबारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. आम्हाला अंत्यविधी करायचे आहेत, फायरिं थांबवा,' असं मशिदीकडून लाऊडस्पिकरच्या माध्यमातून सांगण्यात आल्याची माहिती आमदार जहांगिर मीर यांनी दिली आहे. काश्मीरमधील पुंछ सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरच तनवीरचा दफनविधी करण्यात आला.
नियंत्रण रेषेवर वारंवार होणा-या गोळीबारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. स्थानिक सुरक्षित ठिकाणी निघून जात आहेत. माछील सेक्टरमध्ये तीन जवान शहीद झाल्यानंतर भारताकडून करण्यात आलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर पाकिस्तानने तीन आठवडे शांत बसल्यानंतर पुन्हा गोळीबाराला सुरुवात केली आहे.