दिवाळीला पाक सैन्याला मिठाई नाही
By Admin | Updated: October 23, 2014 13:41 IST2014-10-23T13:41:02+5:302014-10-23T13:41:02+5:30
सीमारेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने भारतीय सीमा सुरक्षा दलाने यंदा दिवाळीला पाक सैन्याला मिठाई न देण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीला पाक सैन्याला मिठाई नाही
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - सीमारेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने भारतीय सीमा सुरक्षा दलाने यंदा दिवाळीला पाक सैन्याला मिठाई न देण्याचा निर्णय घेतला आहे. सीमा रेषेवरील सद्यस्थिती पाहता पाक सैन्याला मिठाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी भूमिका अधिका-यांनी मांडली आहे.
भारत - पाकच्या वाघा सीमारेषेवर दरवर्षी ईद व दिवाळीला दोन्ही देशांचे जवान एकमेकांना मिठाई देण्याची पंरपरा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ईद दरम्यान पाककडून गोळीबार सुरु असतानाही भारतीय जवानांनी पाक सैन्याला मिठाई दिली होती. मात्र पाक सैन्याने ती मिठाई कोणतेही कारण न देता परत केली होती. ईदनंतरही पाकने सीमारेषेवर भारतीय चौक्या व गावांवर हल्ला करणे सुरुच ठेवले आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीर दौ-यावर असतानाही पाकने रामगढ सेक्टरमध्ये गोळीबार केला होता. या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळीत पाकला मिठाई देणार नाही अशी माहिती बीएसएफच्या अधिका-यांनी दिली आहे. पाकसोबत अटारी सीमेवर झालेल्या ध्वजबैठकीत याची माहिती पाकच्या अधिका-यांना देण्यात आल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले.