गेल्या काही काळापासून विवाहबाह्य संबंध, पती-पत्नीमधील वाद यामुळे होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तिच्या प्रियकराकडून सातत्याने धमक्या येत असलेल्या घाबरलेल्या पतीने विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या पतीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.
या पीडित पतीने सुसाईड नोट आणि एका व्हिडीओमधून आपली कैफियत मांडत जिल्हा प्रशासनाला मदतीसाठी विनंती केली आहे. तसेच टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण सांगितलं आहे. आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अमरोहा नगर कोतवाली येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे इक्बाल नावाच्या तरुणाने विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सोबत लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने दानिश आणि एका शिक्षकावर गंभीर आरोप केले. हे दोघेही माझ्या पत्नीला एका खोट्या प्रकरणामध्ये अडकवून तिचा छळ करत होते. एवढंच नाही तर तिला घटस्फोट देण्यासाठी माझ्यावर दबाव आणत होते, तसेच असं न केल्यास जिवे मारण्याची धमकी द्यायचे, असा आरोपही त्याने या सुसाईड नोटमधून केला आहे.
दरम्यान, सातत्याने देण्यात येत असलेल्या धमक्यांमुळे घाबरून तणावाखाली आलेल्या इक्बाल याने सुसाईड नोट लिहून टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. त्याने विषप्राशन केले. प्रकृती बिघडल्यावर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता तिथून अधिक उपचारांसाठी त्याला हायर सेंटर येथे नेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, पीडिताने लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारावर आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी पावलं उचलण्यात येत आहेत.