Pahalgam terror attack Ravant Reddy: २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी हल्ला करत २६ जणांची हत्या केली. दहशतवाद्यांच्या गोळीबारात अनेकजण जखमी झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी केली. मोठी कारवाई केली पाहिजे, मग भले त्याचा अर्थ पाकव्याप्त काश्मीर भारतात आणणं असो, असे रेड्डी म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हैदराबादमध्ये काढण्यात आलेल्या या कॅण्डल मार्चमध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन औवेसी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि इतर सर्वच पक्षांचे नेते आणि लोक सहभागी झाले होते.
'अशा घटना रोखण्यासाठी निर्णायक कारवाई गरजेची'
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, 'पहलगामसारख्या घटना रोखायच्या असतील, तर केंद्र सरकारकडून निर्णायक कारवाई होणे गरजेचे आहे.'
"तुम्ही (पंतप्रधान मोदी) दुर्गा देवीला लक्षात ठेवा आणि कारवाई करा. मग तो पाकिस्तानवर हल्ला असो वा इतर कोणताही उपाय. आज पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली गेली पाहिजेत. ही तडजोड करण्याची वेळ नाहीये. जशास तसे उत्तर द्यायला पाहिजे. तुम्ही पावले उचला आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत. १४० कोटी भारतीय तुमच्यासोबत आहेत", असे रेवंत रेड्डी म्हणाले.
पाकिस्तानचे दोन तुकडे करा -रेवंत रेड्डी
यावेळी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, "पाकिस्तानची दोन तुकड्यांमध्ये विभागणी करा. पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या. आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही दुर्गामातेचे भक्त आहात. इंदिरा गांधींचे स्मरण करा", असे मागणी रेवंत रेड्डी यांनी केली.
औवेसींकडून दंडावर काळी पट्टी बांधून निषेध
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ असदुद्दीन औवेसी यांनी देशातील मुस्लिमांना नमाज अदा करण्यासाठी जाताना दंडावर काळी पट्टी बांधण्याचे आव्हान केले होते.
औवेसींनीही दंडावर काळी पट्टी बांधून नमाज पठण केले. शास्त्रीपुरम येथील एका मशिदीबाहेर औवेसींनी काळ्या पट्ट्यांचे वाटपही केले.