‘त्या’ जवानावर बडतर्फीची कारवाई
By Admin | Updated: April 20, 2017 00:50 IST2017-04-20T00:50:16+5:302017-04-20T00:50:16+5:30
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट आहाराबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या तेज बहाद्दुर यादव यांना बीएसएफने सेवेतून बडतर्फ केले आहे

‘त्या’ जवानावर बडतर्फीची कारवाई
नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना मिळणाऱ्या निकृष्ट आहाराबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या तेज बहाद्दुर यादव यांना बीएसएफने सेवेतून बडतर्फ केले आहे. तेज बहाद्दुर यांनी आपली ही तक्रार सोशल मीडियावर मांडली होती. तक्रारीचा व्हिडीओ व्हायरल करून सिंग बीएसएफची प्रतिमा मलिन केल्याने ही कारवाई करण्यात आली, असे बीएसएफने जाहीर केले आहे.
तेज बहाद्दुर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर जवानांना मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या सुविधांबद्दल देशभर संतापाची लाट उसळली होती.
तसेच जवानांना निकृष्ट आहार मिळत असल्याच्या वृत्ताचा बीएसएफने इन्कार केला होता. त्यानंतर तेज बहाद्दुर यांची अन्यत्र बदली करण्यात आली आणि त्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली नाही. त्यामुळे सिंग यांच्या पत्नीने आपल्या पतीचा ठावठिकाणा कळावा, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
बीएसएफतर्फे तेज बहाद्दुर यांना मनोरुग्ण ठरवण्याचाही प्रयत्न झाला. भ्रष्टाचारावर आवाज उठविल्याबद्दल मला का त्रास दिला जात आहे, असा सवालही तेज बहाद्दुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला होता.