सरकार बरखास्त करा -काँग्रेस
By Admin | Updated: December 3, 2014 01:29 IST2014-12-03T01:29:19+5:302014-12-03T01:29:19+5:30
छत्तीसगड येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काँग्रेसने रमणसिंग सरकारच्या बरखास्तीची मागणी लोकसभेत मंगळवारी केली.

सरकार बरखास्त करा -काँग्रेस
नवी दिल्ली : छत्तीसगड येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर काँग्रेसने रमणसिंग सरकारच्या बरखास्तीची मागणी लोकसभेत मंगळवारी केली. काँग्रेसचे ताम्रध्वज साहू यांनी, राज्यातील स्थानिक प्रशासन कोलमडल्याचे सांगून गेल्या काही वर्षात अनेक जवान ठार झाल्याची माहिती दिली.
गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीनंतरही राज्य सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही, असे सांगितले. गेल्या काही वर्षात येथे २५०० नागरिक ठार झाल्याचा आकडा दिला जात असून तो प्रत्यक्षात १० हजाराहून अधिक असल्याचा दावा त्यांनी केला.
येथे कुठलेच प्रशासन नाही, कुठलीच गुप्तचर यंत्रणा कार्यरत नाही, अशा स्थितीत या राज्यातील सरकार तात्काळ बरखास्त केले जावे अशी मागणी त्यांनी केली.
मात्र, हा पक्षाचा मुद्दा नसून तो राष्ट्रीय प्रश्न असल्याचे उत्तर त्यांना संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी दिले. गृहमंत्री राजनाथसिह हे घटनास्थळाला मंगळवारी भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या हल्ल्यात ठार झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)