डफळापुरातील दुहेरी खून शेतगड्याकडून
By Admin | Updated: January 22, 2015 00:09 IST2015-01-22T00:07:37+5:302015-01-22T00:09:09+5:30
चोवीस तासात छडा : शारीरिक, मानसिक छळामुळे कृत्य, गुन्ाची कबुली

डफळापुरातील दुहेरी खून शेतगड्याकडून
चोवीस तासात छडा : शारीरिक, मानसिक छळामुळे कृत्य, गुन्ाची कबुली
सांगली : जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष, जत पंचायत समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण व त्यांच्या पत्नी शैला चव्हाण (डफळापूर, ता. जत) यांचा खून त्यांच्या शेतगड्यानेच केल्याचे आज (बुधवारी) उघड झाले. याप्रकरणी कालपासून फरारी असलेला त्यांचा शेतगडी परशुराम रामचंद्र हिप्परगी (वय ४३, रा. बरेडही, चमकेरी गावाजवळ, ता. अथणी, जि. बेळगाव, कर्नाटक) यास आज गुंडाविरोधी पथकाने अटक केली. जादा काम लावणे, शिवीगाळ, मारहाण करणे या मानहानीला कंटाळून दोघांचा खून केल्याची कबुली हिप्परगी याने दिली आहे. खुनानंतर चोवीस तासांच्या आत संशयितास अटक केल्यामुळे खुनाचे गूढ उकलले असून, अनेक तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.
डफळापूर येथे सुनील बाळासाहेब चव्हाण (वय ५५) व त्यांची पत्नी शैला चव्हाण (५०) यांचा सोमवारी मध्यरात्री धारदार शस्त्रांनी निघृर्ण खून करण्यात आला होता. शेतातील बंगल्यात रक्ताच्या थारोळ्यात दोन्ही मृतदेह आढळून आले होते. मंगळवारी सकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. या खुनानंतर चव्हाण यांचा शेतगडी परशुराम हिप्परगी बेपत्ता झाला होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता.
गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील व पोलीस पथकाने अथणी पोलिसांच्या सहकार्याने बरेडही गावामध्ये छापा टाकून परशुराम हिप्परगी यास आज पहाटेच अटक केली. यावेळी त्याने खुनावेळी वापरलेले व रक्तात माखलेले कपडे, पळवून नेलेली दुचाकी (क्र. एमएच १० एझेड ३०६१), बूट पोलिसांनी जप्त केले. दुपारी हिप्परगी याची जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी कसून चौकशी केली.
हिप्परगी यास अटक केल्यानंतर अधिक तपासासाठी त्याला जत पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. उद्या त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
चौकट
रात्रभराच्या वेदनेने खुनाचा निय
खुनाच्या आदल्या दिवशी चव्हाण यांनी हिप्परगीच्या नाकावर चहाचा कप फेकून मारला होता. नाकावर मोठी जखम झाल्याने तो वेदनेने रात्रभर विव्हळत होता. त्यामुळे रविवारी रात्री त्याने चव्हाण यांना संपवायचे किंवा स्वत: तरी आत्महत्या करायची, असा निर्णय घेतला. शेवटी त्याने चव्हाण पती-पत्नीचा सोमवारी मध्यरात्री खून करण्याचा निर्णय घेतला. सुनील चव्हाण घरी आल्यानंतर शैला दिवसभराच्या कामातील चुका त्यांच्या निदर्शनास आणून देत होत्या. मारहाण करण्यास प्रवृत्त करीत होत्या. त्यामुळे चव्हाण नेहमी मारहाण करीत. या रागातूनच आपण त्यांचाही खून केला, असे त्याने सांगितले.
चौकट
शेत जाईल या भीतीपोटी खून
चव्हाण यांनी ५० हजारांच्या ॲडव्हान्सपोटी हिप्परगीच्या गावातील पाच एकर कोरडवाहू जमिनीचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले होते. काम सोडल्यास ही जमीन ते बळकावतील, ही भीती हिप्परगीला होती. काम तर सोडायचे होते, मात्र काम सोडल्यास जमीन जाईल, या भीतीपोटी त्याने चव्हाण कुटुंबाला संपविण्याचा निर्णय घेतला.
फोटो : २१एसएन१ : पोलिसांनी परशुराम हिप्परगी याच्याकडून दुचाकी, रक्ताने माखलेले कपडे व बूट जप्त केले.
फोटो : २१एसएन२ : संशयित परशुराम हिप्परगी याच्यासह गुंडाविरोधी पथक.