दिलीप गांधी म्हणतात, तंबाखूने होते अन्नपचन !

By Admin | Updated: April 4, 2015 07:06 IST2015-04-04T05:12:27+5:302015-04-04T07:06:04+5:30

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि कॅन्सरचा अन्योन्य संबंध नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य करून अगोदरच देशभर चर्चेत आलेले भाजपाचे खासदार दिलीप गांधी

Dilip Gandhi says, Tobacco consumes food! | दिलीप गांधी म्हणतात, तंबाखूने होते अन्नपचन !

दिलीप गांधी म्हणतात, तंबाखूने होते अन्नपचन !

नवी दिल्ली/अहमदनगर : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि कॅन्सरचा अन्योन्य संबंध नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य करून अगोदरच देशभर चर्चेत आलेले भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी पुन्हा तंबाखूची पिंक टाकली. ‘तंबाखू सेवनाने कॅन्सर होतो, हे अद्याप सिद्ध झालेले नाही; पण अन्नपचन मात्र होते’, असा जावई शोध त्यांनी लावला आहे.
विशेष म्हणजे देशात तंबाखू विक्रीशी संबंधित नियमांच्या समीक्षेसाठी नेमलेल्या संसदीय समितीचे खा. गांधी हे अध्यक्ष आहेत.
आढळगाव (जि. नगर) येथे पत्रकारांशी बोलताना खा. गांधी म्हणाले, की मी संसदेत नुसत्या तंबाखूने नव्हे तर इतर कारणांनी कॅन्सर होतो, असे बोललो़ परंतु माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. विडी व्यवसायावर दोन कोटी नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. तंबाखू व्यवसायाबाबत अमेरिका आणि भारताची परिस्थिती वेगळी आहे. आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करणारे निर्णय घ्यावे लागतात. परंतु काही समाजसेवकांची काही झाले तरी उठाठेव सुरू होते, असेही ते म्हणाले.
भाजपा खासदाराची मुक्ताफळे
भाजपाचे आणखी एक खासदार रामप्रसाद सरमाह यांनीही तंबाखूजन्य पदार्थांच्या समर्थनार्थ मुक्ताफळे उधळली आहेत. सिगारेट आणि कर्करोग यांचा संबंध असल्याचे कुठलेही स्पष्ट पुरावे नसल्याचे सरमाह यांनी म्हटले आहे. सिगारेटमुळे कर्करोग होतो वा नाही, हा वादविवादाचा मुद्दा आहे. दररोज एक बाटली दारू पिणारे आणि ४० सिगारेट ओढणाऱ्या दोन ज्येष्ठ वकिलांना मी ओळखतो. यापैकी एक अद्यापही हयात आहेत. कर्करोगाशिवाय त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत आणि दुसरे गृहस्थही वयाच्या ८६ वर्षांपर्यंत सुदृढ आयुष्य जगल्यानंतर स्वर्गवासी झाले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
गुप्ता यांनी केले विडीचे समर्थन
भाजपाचेच अलाहाबादचे खासदार आणि बडे विडी व्यावसायिक श्यामचरण गुप्ता यांनी विडीचे समर्थन  केले आहे. बिडी पिल्यामुळे कुठलीही शारीरिक हानी होत नाही. दररोज कित्येक बिडी पिणाऱ्या पण ज्यांना कर्करोग नाही, असे म्हणाल तेवढे लोक मी तुमच्यापुढे उभे करू शकतो, असा दावा गुप्ता यांनी केला. साखर, भात, बटाट्याने मधुमेह होतो म्हणून या सर्व वस्तूंवर आपण धोक्याचा इशारा लिहितो का, असा सवालही त्यांनी केला.
विरोधकांची टीका
भाजपा खासदारांच्या तंबाखूजन्य पदार्थांबाबतच्या या विधानांमुळे विरोधकांच्या भुवया ताणल्या आहेत. जदयू नेते के.सी. त्यागी यांनी शुक्रवारी भाजपा खासदारांच्या या विधानांवर जोरदार टीका केली. भाजपा खासदारांची वक्तव्ये म्हणजे, हितासाठीचा संघर्ष आहे. तंबाखू ही आरोग्यासाठी हानिकारक आहे, यावर भारत सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेनेही शिक्कामोर्तब केले आहे, असे त्यागी म्हणाले.
मित्रपक्षाचाही आक्षेप
भाजपा प्रणीत रालोआ सरकारमधील घटक पक्ष असलेल्या पीएमकेनेही भाजपा खासदारांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. कुठल्याही शास्त्रीय आधाराशिवाय भाजपा खासदारांनी केलेली वक्तव्ये पूर्णत: अज्ञानी व मूर्खपणाची आहेत. या लोकांनी अज्ञान पाजळणारी अशी वक्तव्ये थांबवावीत, असे पीएमकेचे संस्थापक नेते आणि माजी केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Dilip Gandhi says, Tobacco consumes food!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.