Operation Sindoor pakistan nuclear location: पाकिस्तानने सलग दोन रात्री हवाई हल्ले केल्यानंतर भारताने पाकिस्तानवर जबरदस्त प्रहार केला. भारताने पाकिस्तानच्या तीन हवाई तळांसह इतर काही ठिकाणीही मिसाईल्स डागल्या. यात भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणाजवळही हल्ला केल्याची चर्चा आहे. त्यावर आता लष्कराच्या अधिकाऱ्यानेच अधिकृत भूमिका मांडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अण्वस्त्र ठिकाण असलेल्या किराना हिल्स या ठिकाणी हवाई हल्ला करण्यात आला का? असा प्रश्नही विचारण्यात आला होता.
किराना हिल्सवर भारताने हल्ला केला का?
भारताचे एअर मार्शल ए.के. भारती यांना प्रश्न विचारण्यात आला की, भारताने किराना हिल्सवर हल्ला केलाय का?
वाचा >>"चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
या प्रश्नाला उत्तर देताना एअर मार्शल भारती म्हणाले, "किराना हिल्समध्ये अण्वस्त्र स्टोरेज आहे, हे आम्हाला सांगण्यासाठी आभार. आम्हाला याबद्दल माहिती नव्हते. आम्ही किराना हिल्सवर हल्ला केला नाही. मग तिथेही काहीही असो अथवा नसो. काल झालेल्या पत्रकार परिषदेत आमच्याकडून सगळी माहिती दिली गेली आहे."
किराना हिल्स का संवेदनशील आहे?
माहितीप्रमाणे सरगोधा हवाई तळापासून किराना हिल्स ८ किमी अंतरावर आहे. ७० चौरस किमी इतक्या क्षेत्रावर जमिनीखाली फॅसिलिटी केंद्र आहे. या संपूर्ण परिसरावर पाकिस्तान सरकारचे नियंत्रण आहे.
जगाला या जागेची पहिल्यांदा माहिती १९९० मध्ये कळली. जेव्हा अमेरिकेच्या सॅटलाईट्स पाकिस्तान सरकारकडून केल्या जात असलेल्या अण्वस्त्र चाचण्या पकडल्या. अमेरिकेने यावर आक्षेप घेतल्यानंतर या अण्वस्त्र चाचण्या रद्द करण्यात आल्या. पण, तरीही अशी शंका आहे की, पाकिस्तानने या ठिकाणी अण्वस्त्र लपवून ठेवलेली आहेत.
भारताचा पाकिस्तानातील ११ एअरबेसवर हल्ला
पाकिस्तानकडून हवाई हल्ले करण्यात आल्यानंतर भारतानेही तसेच उत्तर दिले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर हल्ला चढवला. भारतीय लष्कराने डागलेल्या मिसाईल्समुळे या हवाई तळांचं मोठं नुकसान झालं आहे. यात सरगोधा पासून नूर खान एअर बेसचाही समावेश आहे.