दिल्लीतील धौला कुआन परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका भीषण अपघातात भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील डेप्युटी सेक्रेटरी नवजोत सिंग यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. नवजोत सिंग आणि त्यांची पत्नी बाईकवरून घरी परतत असताना मेट्रो पिलर क्रमांक ५७ जवळ हा अपघात झाला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताच्या वेळी एक महिला बीएमडब्ल्यू कार चालवत होती आणि तिचा पतीही तिच्यासोबत होता. बीएमडब्ल्यू कारने नवजोत यांच्या बाईकला धडक दिली, त्यानंतर बाईक प्रथम डिव्हायडरला धडकली आणि नंतर बसला धडकली. अपघातात अधिकारी नवजोत सिंग आणि त्यांची पत्नी जखमी होऊन रस्त्यावर पडले.
अधिकाऱ्याच्या बाईकला धडक देणाऱ्या महिलेने आणि तिच्या पतीने घटनास्थळी कॅब बोलावली आणि त्यांना रुग्णालयात नेलं परंतु नवजोत सिंग यांना वाचवता आलं नाही. त्यांच्या पत्नीची प्रकृतीही गंभीर आहे. नवजोत यांना जवळच्या रुग्णालयात नेण्याऐवजी १७ किमी अंतरावरील जीटीबी नगर येथील न्यूलाइफ रुग्णालयात नेण्यात आलं असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
नवजोत यांच्या पत्नीची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजोत सिंग दिल्लीतील हरी नगर येथील रहिवासी होते आणि ते अर्थ मंत्रालयात कार्यरत होते. अपघातानंतर पोलिसांनी बीएमडब्ल्यू कार जप्त केली आहे. क्राइम टीम आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.