धर्म जागरण मंचाची डेडलाइन, म्हणे २०२१ पर्यंत भारताला हिंदू राष्ट्र बनवू
By Admin | Updated: December 18, 2014 18:43 IST2014-12-18T12:46:42+5:302014-12-18T18:43:33+5:30
३१ डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात राहणा-या सर्वांना हिंदू बनवू असे वादग्रस्त विधान धर्म जागरण मंचाचे नेते राजेश्वर सिंह यांनी केले आहे.

धर्म जागरण मंचाची डेडलाइन, म्हणे २०२१ पर्यंत भारताला हिंदू राष्ट्र बनवू
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - वाढत्या विरोधानंतर धर्म जागरण मंचाने 'घर वापसी'चा कार्यक्रम स्थगित केला असला तरी मंचाच्या नेत्यांनी वादग्रस्त विधान करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. मुस्लिम व ख्रिस्ती समुदायाला भारतात राहण्याचा हक्कच नाही असे विधान मंचाचे नेते राजेश्वर सिंह यांनी केले असून यावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
धर्मांतराच्या मुद्द्यावरुन सध्या संसदेत विरोधकांनी सरकारची कोंडी केली असून वाढत्या विरोधामुळे धर्म जागरण मंचाला मुस्लिमांना हिंदू धर्मात आणण्याचा कार्यक्रम स्थगितही करावा लागला. मात्र या धर्म जागरण मंचाचे नेते राजेश्वर सिंह यांनी वादग्रस्त विधान केले. ख्रिश्नन आणि मुसलमानांना संपवून ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी भारताला हिंदू राष्ट्र बनवू असा आमचा संकल्प असल्याचे राजेश्वर सिंह यांनी सांगितले. धर्म जागरण मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत संघटना आहे. राजेश्वर सिंह यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसली तरी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी यावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. अल्पसंख्याक दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे आज मोदींचे छायाचित्र असलेली मोठी जाहिरात देण्यात आली आहे. मोदींनी आज या दिनानिमित्त राज्यसभेत उपस्थित राहून जातीयवादाच्या मुद्द्यावर उत्तर द्यावे अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली आहे. धर्मजागरण मंचाचे नेते जे बोलत आहे ते भाजपाने स्वीकारावे किंवा त्यांचा विरोध करावा असे आव्हानही त्यांनी केंद्र सरकारला दिले आहे.
दरम्यान, धर्मांतराच्या मुद्यावरुन गुरुवारीदेखील संसदेत विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यसभेत यावर मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेसने केली असून मोदी सरकारने मात्र विरोधकांसमोर नमते न घेण्याची कणखर भूमिका घेतली आहे.