निसर्गाच्या प्रकोपाचं एक भयंकर रुप मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बघायला मिळालं. ढगफुटी झाली आणि त्यानंतर अचानक आलेल्या पुरात निम्मे धराली गाव मातीखाली गाडले गेले. धरालीबरोबरच सुखी टॉप जवळही ढगफुटी झाली. धरालीमध्ये ज्या ठिकाणी ढगफुटी झाली, तिथून गंगोत्री धाम फक्त १८ किमी अंतरावर आहे. तर भारतीय लष्कराच्या हर्षिल कॅम्पपासून हे ठिकाण फक्त ४ किमी दूर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ढगफुटीनंतर धरालीमध्ये झालेल्या प्रलयाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. ढगफुटी झाल्यानंतर खीर गंगा ओढ्याला पूर आला आणि अवघ्या ३४ सेकंदात अचानक आलेल्या पाणी आणि मातीच्या पुरात गावीतील घरे गाडली गेली.
जो मलबा खीर गंगेच्या पात्रातून आला होता, तो भगीरथी नदीच्या पात्रात मिळाला. भगीरथी नदीच्या पात्रात जाताना हा मलबा निम्म्यातील धरातील घरांचा घास घेऊन गेला. पुराचे पाणी बऱ्याच अंतरावरून आणि उंचीवरून आले, त्यामुळे त्याला प्रचंड वेग होता. धराली गाव नदीच्या काठावर आहे. काठाच्या दोन्ही बाजूंना घरे होती. त्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते थेट गावात घुसले.
भगीरथी नदीच्या काठावर धराली, हर्षिल, आणि बेली अशा छोट्या आकारातील गावे आहेत. हर्षिलमध्ये लष्कराची छावणी आहे, त्यामुळे धरालीमध्ये शोध कार्य सुरू करण्यात मदत झाली.
धराली गाव समुद्र सपाटीपासून १२६०० फूट उंचीवर आहे. पाणी आणि गाळ ४३ किमी प्रतितास या वेगाने १२३० फूट इतक्या उंचीवरून खाली आला होता आणि गावात शिरला. खीर गंगा ओढ्याला गावाजवळच वळण आहे, त्यामुळे गावातील घरांचे जास्त नुकसान झाले.