Operation Sindoor: भारताने नऊ शहरांमध्ये हल्ले केल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता जम्मू शहर व अन्य ठिकाणी हल्ले करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने उधळून लावला. पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे व सुमारे ५० ड्रोन भारताने पाडले. त्यानंतर भारताने मध्यरात्री पाकच्या अनेक शहरांवर हल्ला केल्याचे वृत्त होते. भारताने चहुबाजूंनी पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली आहे. एकीकडे भारताच्या तिन्ही दलांकडून सडेतोड उत्तर दिले जात असून, दुसरीकडे भारत जागतिक स्तरावर राजनैतिक चर्चेतून आपली भूमिका ठामपणे मांडत आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिका, युरोपीय युनियनसह अन्य देशांशी संवाद साधत भारताची बाजू स्पष्ट केली आहे. यातच गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या मंदिरात विशेष पूजा केली जात असून, भारतीय सैन्याला बळ मिळावे, पाकिस्तानचा खात्मा व्हावा, असे साकडे भाविकांकडून घातले जात आहे.
पाकिस्तानचा खात्मा करण्यासाठी कामाख्या देवी भारतीय सैन्यला बळ देवो आणि यश देवो. पाकिस्तान सातत्याने भारतावर हल्ले करत आहे. पाकिस्तानवर किंचितही विश्वास नाही. भारत सरकार आणि भारतीय सैन्याला एवढेच सांगू इच्छितो की, पाकिस्तानला संपवून टाका. आतापर्यंत भारताने खूप सहन केले आहे. पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. भारतीय नागरिक म्हणून सांगतो की, पाकिस्तानशी प्रेमाने वागायची काही गरज नाही. संपवून टाका, अशी प्रतिक्रिया कामाख्या मंदिरात आलेल्या जयकुमार दास यांनी व्यक्त दिली.
दहशतवाद संपवण्यासाठी कामाख्या देवी भारतीय सैन्याला शक्ती देवो
दहशतवाद संपवण्यासाठी कामाख्या देवी भारतीय सैन्याला शक्ती देवो. भारतीय सैन्यांचा आम्हाला अभिमान आहे. दहशतवादाचे समूळ उच्चाटन होत नाही, तोपर्यंत अशी कारवाई सुरूच ठेवायला हवी. आम्ही भारतीय सैन्याला सलाम करतो. जय हिंद, असे दिल्लीचे रहिवासी आणि कामाख्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या शंतनू रॉय यांनी म्हटले आहे. तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबासोबत सहवेदना व्यक्त करतो. या कठीण काळातून जायची देवी त्यांना शक्ती देवो. देश चालवताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. तसेच दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्यांना देवी शक्ती देवो आणि यात त्यांना विजय प्राप्त होवो, असे सुश्मिता रॉय यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील बंडखोर संघटना बलोच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर मोठा हल्ला केला आहे. तसेच, सामरिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली एक गॅस पाइपलाइन उडवून दिली आहे. एकीकडे भारतीय सैन्य पाकिस्तावर हल्ले करत आहे, तर दुसरीकडे बलोच आर्मीकडून पाकला दणक्यावर दणके बसत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे.