Ayodhya Ram Mandir News: २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर कोट्यवधी भाविकांनी अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेतले. याच राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबारही पूर्ण झाला आहे. यातच आता राम जन्मभूमी मंदिराचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण झाल्याची घोषणा अलीकडेच करण्यात आली. यातच देश-परदेशातील भाविकांनी राम मंदिरासाठी तब्बल ३ हजार कोटींचे दान दिल्याची माहिती मिळाली आहे.
राम मंदिर निर्माणाव्यतिरिक्त भाविकांसाठी पूजा प्रार्थनेची सोय, फुटपाथ, दर्शनाचा भाग, भाविकांचा ओघ नियंत्रित करण्याच्या व्यवस्थाही पूर्ण करण्यात आल्या आहेत. १० एकरचा पंचवटी भाग जवळपास पूर्ण करत आणला आहे. आता मुख्य मंदिराच्या आसपासची भगवान शिव, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती, देवी अन्नपूर्णा मंदिर पूर्ण झाले आहे. आता संपूर्ण राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्य मंदिरावर ध्वजारोहणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येत येत आहेत.
तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च
राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलन मोहिमेदरम्यान, भारत आणि परदेशातील लाखो रामभक्तांनी मुक्त हस्ताने योगदान दिले. ३ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम रामलला चरणी अर्पण केली. इमारत बांधकाम समितीच्या अध्यक्षांच्या मते, आतापर्यंत अंदाजे १,५०० कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. मंदिर संकुलातील उर्वरित चालू कामासह एकूण खर्च अंदाजे १,८०० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, मुख्य मंदिराच्या आसपासच्या सहा मंदिरांवर ध्वजदंड व कलशही स्थापन करण्यात आला आहे. तसेच महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, शबरी आणि अहिल्या मंदिर सप्त मंडपाचेही काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर ‘राम परिवार’ आसनस्थ झाला असून मोदी येथे बसून आरती करणार आहेत. त्यानंतर मंदिराच्या शीर्षस्थानी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करणार असल्याचे ट्रस्ट संचालकांनी सांगितले.