विस्तारित नागपूरचा विकास मूलभूत सुविधांच्या माध्यमातून साधणार -१
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:02+5:302014-12-25T22:41:02+5:30
विस्तारित नागपूरचा विकास

विस्तारित नागपूरचा विकास मूलभूत सुविधांच्या माध्यमातून साधणार -१
व स्तारित नागपूरचा विकास मूलभूत सुविधांच्या माध्यमातून साधणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : २३२ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन नागपूर : बेसा-बेलतरोडी भागात नागपूर शहराचा वेगाने विस्तार होत आहे. विस्तारित नागपूरच्या भागात पाणीपुरवठा योजना सुरू करून येथील मूलभूत सुविधांच्या माध्यमातून विस्तारित नागपूरचा विकास साधला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बेसा येथे नागपूर निमशहरी, प्रादेशिक पाणी योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी होते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आमदार जयकुमार रावल, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, महाराष्ट्र प्राधिकरणाच्या सदस्य सचिव सोनिया सेठ, पंचायत समिती सभापती नर्मदा राऊत, बेसाच्या सरपंच शालिनी कंगाली यावेळी उपस्थित होते. नागपूरलगतच्या बेसा-बेलतरोडी पिपळा, घोगडी, हुडकेश्वर (खुर्द), खरबी, बहादुरा, गोन्ही आणि कापसी (खुर्द) या गावासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेवर २३२ कोटी ७४ लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही योजना सप्टेंबर २०१६ अखेर पूर्ण होणार असून दहा गावातील नागरिकांना प्रती व्यक्ती ७० लीटर शुद्ध व स्वच्छ पाणी दररोज उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मेट्रो रिजन आणि त्याअंतर्गत असलेल्या योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. नगररचना कायदा मंजूर केल्यामुळे आता नियोजनबद्ध पद्धतीने शहराचा विकास करता येईल. विकास करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येतील. गावठाणच्या भागाची परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला दिल्यामुळे ते अधिकृत ठरतील. घरांचे ५६ प्रकारचे टाईप प्लान शासनाने तयार केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या टाईप प्लाननुसार नागरिकांनी बांधकामासाठी अर्ज केल्यास सात दिवसाच्या आत मंजुरी देण्यात येईल. विकास हा नियमानुसार व्हावा तो अवैध प्रकार होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बेसा-बेलतरोडी भागासाठी नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.