देवस्थान इनाम जमिनीबाबत महसूलमंत्र्यांशी चर्चा करणार
By Admin | Updated: April 25, 2016 00:57 IST2016-04-25T00:11:32+5:302016-04-25T00:57:16+5:30
संतराम पाटील : देवस्थान इनाम जमीनधारक शेतकरी संघटनेचा मेळावा

देवस्थान इनाम जमिनीबाबत महसूलमंत्र्यांशी चर्चा करणार
कोल्हापूर : देवस्थानच्या जमिनी या कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करा, सात-बारा पत्रकी संबंधित शेतकऱ्यांची नावे ‘मालकी हक्क’ सदरात नोंद करा, आदी मागण्यांसाठी बुधवारी (दि. २७) मुंबईत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य देवस्थान इनाम जमीनधारक शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात घेण्यात आला. येथील टाऊन हॉल उद्यानात करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संतराम पाटील हे होते.
या बैठकीत, देवस्थानच्या जमिनीच्या विकासासाठी मध्यम मुदत व दीर्घ मुदतीची कर्जे, पीक कर्जे मिळण्याची तरतूद करावी, देवस्थानच्या जमिनी छुप्या मार्गाने शेतकऱ्यांना वेठीस धरून सुरू असलेली खरेदी-विक्री बंद करावी, इनामी जमिनीसंबंधी शासकीय समितीवर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी घ्यावा. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर संघटनेचा प्रतिनिधी घ्यावा. जमिनींवर वारसा नोंदी करून मिळाव्यात. हिंदू राजांनी मुस्लिम देवस्थानला दिलेल्या जमिनी गेल्या सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्या वक्फ बोर्डाला जोडल्या
त्या पूर्ववत कराव्यात, आदी
मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
मेळाव्यात जिल्हाध्यक्ष संतराम पाटील, मोडीतज्ज्ञ वसंतराव सिंघन, करवीर तालुका अध्यक्ष किरण पाटील, राधानगरी तालुका अध्यक्ष कमलाकर कांबळे, जिल्हा सचिव वसंतराव चांदूरकर, विजय पाटील आदींनी आपले विचार मांडले.
यावेळी बुधवारी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांच्यासोबतच्या चर्चेतून मार्ग न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मेळाव्यास प्रकाश कांबळे, खंडू चरणकर, शिवाजी पिंजरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)