बंगळुरुतल्या लैंगिक हल्ल्यामागे मेहुणीबरोबर लग्न करण्याची इच्छा
By Admin | Updated: January 9, 2017 13:20 IST2017-01-09T13:20:52+5:302017-01-09T13:20:52+5:30
उत्तर बंगळुरुतील नागावारामध्ये शुक्रवारी झालेल्या 23 वर्षीय महिलेच्या छेडछाड प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बंगळुरुतल्या लैंगिक हल्ल्यामागे मेहुणीबरोबर लग्न करण्याची इच्छा
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 9 - उत्तर बंगळुरुतील नागावारामध्ये शुक्रवारी झालेल्या 23 वर्षीय महिलेच्या छेडछाड प्रकरणात नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीच्या बहिणीबरोबर लग्न करण्यासाठी आरोपी इरशाद खानने हा कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिली. इरशादचे पत्नीच्या बहिणीबरोबर संबंध होते. त्याला तिच्याबरोबर लग्न करायचे होते.
आपल्या या नात्याला पत्नी आणि कुटुंबिय कधीही तयार होणार नाहीत याची इरशादला खात्री होती. त्यासाठी त्याने पत्नीच्या बहिणीवर लैंगिक हल्ला घडवून तिची प्रतिमा मलिन करायची. जेणेकरुन तिचे ठरलेले लग्न मोडेल आणि मग लग्नासाठी हात मागायचा अशी योजना आखली व तसा हल्ला घडवून आणला.
बंगळुरुमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री मोठया प्रमाणावर महिलांचा विनयभंग झाला होता. ते व्हिडीओ पाहून इरशादला ही कल्पना सुचली. या कटामध्ये महिला सहभागी होती की नाही ते अजून स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार पीडीत महिलासुद्धा या कटात सहभागी होती. त्यासंबंधीचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.
शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. पीडित तरुणी अरेबिक कॉलेज बसस्टॉपच्या दिशेने जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने तिचा चावाही घेतला. तरुणीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने पळ काढला.