विभागीय आयुक्त करणार चौकशी?
By Admin | Updated: April 27, 2016 00:16 IST2016-04-26T23:11:57+5:302016-04-27T00:16:35+5:30
आदिवासी विकास भरती घोटाळा प्रकरण : मंत्री-सचिवांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक

विभागीय आयुक्त करणार चौकशी?
आदिवासी विकास भरती घोटाळा प्रकरण : मंत्री-सचिवांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक
नाशिक : आदिवासी विकास महामंडळ व शबरी विकास महामंडळातील कथित भरती घोटाळा प्रकरणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना चौकशी करण्यासाठी नियुक्ती केल्याचे वृत्त आहे.
मंगळवारी (दि.२६) रात्री उशिरा नाशकात आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा व प्रधानसचिव राजगोपाल देवरा हे येणार असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात रात्री उशिरापर्यंत ते नाशिकमध्ये दाखल झालेले नव्हते. दोन दिवसांपूर्वीच आदिवासी विकास महामंडळ व शबरी विकास महामंडळातील नोकर भरतीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी भरती घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी संबंधित अधिकार्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली होती. आदिवासी व शबरी विकास महामंडळांतर्गत ५८४ पदांसाठी झालेल्या नोेकर भरतीत ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, या नोकर भरतीची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आदिवासी विकास विभागाला दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नियुक्त करण्यात आली होती. मंगळवारी याप्रकरणाला कलाटणी मिळाली असून, आता या भरती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आल्याचे कळते. विशेष म्हणजे शुक्रवारी (दि.२२) रात्री अचानक आदिवासी विकास विभागात आग लागून त्यात काही संगणक जळाले. भरती घोटाळ्यातील चौकशी सुरू होण्यापूर्वीच हे जळीतकांड घडल्याने त्याचा भरती घोटाळ्याशी संबंध असून, तो पुरावा नष्ट करण्याचाच एक भाग असल्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दुसर्या दिवशी या जळीतकांडाची पाहणी करताना आरोप केला होता. (प्रतिनिधी)