ग्रेस मार्कांनी पास झालेला 'हार्दिक' करतोय आरक्षणाची मागणी
By Admin | Updated: August 28, 2015 11:41 IST2015-08-28T11:37:53+5:302015-08-28T11:41:11+5:30
इतर आरक्षित समाजातील विद्यार्थ्यांमुळे पाटीदार पटेल समाजातील गुणवंत, हुशार तरूणांवर अन्याय होत असल्याचे सांगत आरक्षणाची मागणी करणारा हार्दिक पटेल हा मात्र ग्रेस मार्क्स मिळवून पदवीधर झाला आहे.

ग्रेस मार्कांनी पास झालेला 'हार्दिक' करतोय आरक्षणाची मागणी
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २८ - इतर आरक्षित समाजातील विद्यार्थ्यांमुळे पाटीदार पटेल समाजातील गुणवंत, हुशार तरूणांवर अन्याय होत असल्याचे सांगत आरक्षणाची मागणी करणारा विशीतील तरूण हार्दिक पटेल हा मात्र ग्रेस मार्क्स मिळवून पदवीधर झाल्याचे समोर आले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करून संपूर्ण गुजरात वेठीस धरणारा हार्दिक हा फक्त बी.कॉम झाला असून ती परीक्षाही तो ग्रेस मार्क्स मिळाल्यामुळेच पास झाला होता, अशी माहिती उघड झाली आहे.
अतिशय उत्तम गुण मिळवूनही पाटीदार समाजातील तरूणांना स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होता येत नाही, ना मेडिकलमध्ये प्रवेश मिळतो. पण अवघे ४४ टक्के मिळवणा-या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना मात्र तिथे लगेचच प्रवेश मिळतो असे भाषणांमधून सांगत हार्दिक आरक्षणाची मागणी करत असतो. इतर विद्यार्थ्यांना मिळणा-या आरक्षणामुळे पाटीदार समाजातील तरूणांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळत नसल्याचे तो सांगतो. पण इतर हुशार विद्यार्थ्यांचे गुणगान करणा-या हार्दिकला स्वत:ला मात्र बीकॉमच्या परीक्षेत फर्स्टक्लासही मिळाला नव्हता. ती अंतिम परीक्षा तो अवघे ४९ टक्के मिळवून उत्तीर्ण झाला होता. अभ्यासात कधीच चांगला नसलेला हार्दिक अंतिम परीक्षेतील एका विषयात तर नापासच झाला होता, मात्र शिक्षकांनी त्याला ८ गुण ग्रेस म्हणून दिल्यानेच तो पदवीधर होऊ शकला.