तरुण विजय यांच्यावर कारवाईची मागणी
By Admin | Updated: April 10, 2017 23:55 IST2017-04-10T23:55:05+5:302017-04-10T23:55:05+5:30
भाजपचे नेते तरुण विजय यांनी केलेल्या कथित वांशिक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी लोकसभेत विरोधकांनी सोमवारी केली.

तरुण विजय यांच्यावर कारवाईची मागणी
नवी दिल्ली : भाजपचे नेते तरुण विजय यांनी केलेल्या कथित वांशिक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी लोकसभेत विरोधकांनी सोमवारी केली. तत्पूर्वी, कोणालाही जात व त्याच्या कातडीच्या रंगावरून भेदभावाची वागणूक दिली जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले होते.
तापलेले वातावरण शांत करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी तरुण विजय यांनी आधीच क्षमा मागितलेली असून देश धर्मनिरपेक्ष आहे, असे सांगितले. विरोधी सदस्यांनी जोरजोरात आरडाओरड करायला सुरवात केली व त्यांनी तरुण विजय यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. या गोंधळामुळे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले.
तरूण विजय यांची शेरेबाजी ही देशाच्या ऐक्याला धोका असून तुम्हाला हा देश तोडायचा आहे. या गोष्टी अशाच घडत गेल्या तर राज्ये स्वातंत्र्याची मागणी करतील, असा इशारा काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला.
यावरून तुमची मानसिकता दिसते, असे सांगून तरूण विजय यांच्या त्या वक्तव्याची तुलना खरगे यांनी हिटलरशी केली व त्यांचा निषेध केला. त्यावर राजनाथ सिंह
यांनी भारत देश धर्मनिरपेक्ष
असून कोणालाही जात, वंश आणि धर्माच्या आधारे पक्षपाती
वागणूक दिली जाणार नाही. विजय यांनी स्वत:च त्यांचे ते
वक्तव्य समर्थनीय नाही असे म्हणून क्षमा मागितली आहे, असे
सांगितले. तरीही घोषणा सुरूच राहिल्यावर अध्यक्षा सुमित्रा
महाजन यांनी हे सभागृह
काही न्यायालय नाही, असे म्हटले.
ते भारतीय नाहीत?
- या मुद्यावर सत्ताधाऱ्यांवर हल्ला करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन
खरगे म्हणाले की दक्षिण भारतातून आलेले लोक भारतीय नागरिक नाहीत
का? आम्ही भारतीय आहोत की नाही हे मला समजले पाहिजे.
तरूण विजय ही काही सामान्य व्यक्ती नाही त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई केली हे समजले पाहिजे.
कारण तरूण विजय हे माजी राज्यसभा सदस्य असून भाजपच्या तत्वज्ञानावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, असे खरगे म्हणाले.